लेजेंड्स लीग क्रिकेटची ओमानमध्ये धमाकेदार सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात इंडिया महाराजास संघाने आशिया लायन्स संघाचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आशिया लायन्स संघाने २० षटकात १७५ धावा केल्या. इंडिया महाराजासने विजयाचे लक्ष्य २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पूर्ण केले. भारताच्या विजयात युसूफ पठाणचा महत्त्वाचा वाटा होता. त्याने ४० चेंडूत ८० धावांची स्फोटक खेळी खेळली. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ९ चौकार लगावले. युसुफशिवाय या सामन्यात संघाचा कर्णधार मोहम्मद कैफनेही ४२ धावा केल्या.
यापूर्वी आशिया लायन्सकडून उपुल थरंगाने ६६ आणि कर्णधार मिसबाह-उल-हकने ४४ धावा केल्या होत्या. इंडिया महाराजासतर्फे वेगवान गोलंदाज मनप्रीत गोनीने ३ आणि इरफान पठाणने २ बळी घेतले. लायन्सकडून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि उमर गुलने १-१ बळी घेतला.




भारत महाराजासमोर विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य होते. याचा पाठलाग करताना संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाला १७ धावांवर पहिला धक्का बसला. १० धावा काढून स्टुअर्ट बिन्नी शोएब अख्तरचा बळी ठरला. यानंतर एस बद्रीनाथ (०) आणि नमन ओझा (२०) हेही लवकर बाद झाले. भारताने एका वेळी ३४ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. मात्र यानंतर युसुफ पठाण आणि कर्णधार मोहम्मद कैफ यांनी चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली.
शतकाकडे कूच करणारा युसुफ १७व्या षटकात धावबाद झाला. मात्र, तोपर्यंत युसुफने आपले काम केले आणि संघाचा विजय निश्चित केला. इरफान पठाणने १० चेंडूत २१ धावा करत इंडिया महाराजासचा पहिला सामना जिंकला. इंडिया महाराजासचा पुढील सामना शनिवारी वर्ल्ड जायंट्सविरुद्ध रंगणार आहे.