, हो चि मिन्ह सिटी (व्हिएतनाम) आशियाई कनिष्ठ विजेता लक्ष्य सेनने दुखापतीमुळे व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे भारताची मदार प्रामुख्याने अजय जयरामवर अवलंबून आहे. ‘‘आशियाई कनिष्ठ स्पर्धेनंतर सरावाच्या वेळी त्याला स्नायूंच्या दुखण्याचा त्रास सुरू झाला आहे. याबाबत फिजिओ हीथ मॅथ्यूज हे त्याच्यावर उपचार करीत आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार लक्ष्य याला व्हिएतनाम स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे,’’ असे लक्ष्यचे प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले. लक्ष्यने नुकतीच आशियाई कनिष्ठ स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या स्पर्धेत ५३ वर्षांनंतर भारताला अजिंक्यपद मिळाले होते. व्हिएतनाम येथील स्पर्धेत जयरामकडून अजिंक्यपदाची आशा आहे. त्याने व्हाइट् नाइट्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. त्याला येथील पहिल्या लढतीत लिदुक फोट या स्थानिक खेळाडूबरोबर झुंजावे लागणार आहे. भारताच्या मिथुन मंजुनाथला पहिल्या लढतीत पात्रता फेरीतील खेळाडूचे आव्हान असणार आहे. अभिषेक येलिगर हा मॉरिशसच्या जॉर्जेस ज्युलियन पॉलबरोबर खेळणार आहे तर राहुल यादवची तिएन मिन्ह निग्वेनशी गाठ पडेल. श्रेयांश जयस्वालला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या खेळाडूशी लढत द्यावी लागेल. एकेरीत सिद्धार्थ प्रताप सिंग, कार्तिक गुलशन कुमार व बोधित जोशी हे आणखी भारतीय खेळाडूही आपले नशीब अजमावणार आहेत. महिलांमध्ये जी. ऋत्विका शिवानीला पहिल्या सामन्यात मलेशियाच्या यिन फुनलिमशी खेळावे लागणार आहे. मुग्धा आग्रे हिची सातव्या मानांकित हान युईशी लढत होईल. भारताच्या रसिका राजे, श्रीकृष्णा प्रिया, वैदेही चौधरी यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुहेरीत जे. मेघना व पूर्विशा राम यांना द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. मिश्र दुहेरीत पूर्विशा ही शिवम शर्माच्या साथीने सहभागी झाली आहे.