तमिळनाडूकडून ५४ धावांनी पराभव; मुलानीची अष्टपैलू चमक व्यर्थ

कर्णधार शाम्स मुलानीने (१०० चेंडूंत ७५ धावा आणि १ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीनंतरही गतविजेत्या मुंबई संघाला विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात तमिळनाडूकडून पराभव पत्करावा लागला.

शाहरुख खानची (३५ चेंडूंत ६६ धावा) धडाकेबाज फलंदाजी आणि मणिमरन सिद्धार्थ (३/४३), वॉशिंग्टन सुंदर (३/६०) या फिरकी जोडीच्या प्रभावी माऱ्यामुळे तमिळनाडूने ब-गटातील या लढतीत ५४ धावांनी दमदार विजय मिळवला. मुंबईची गुरुवारी बडोद्याशी गाठ पडणार आहे.

प्रथम फलंदाजी करताना बलाढ्य तमिळनाडूने ५० षटकांत ८ बाद २९० अशी धावसंख्या उभारली. ३७.३ षटकांत ५ बाद १७९ अशी अवस्था असताना फलंदाजीला आलेल्या शाहरुखने सहा चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी करून तमिळनाडूला पावणेदोनशे धावांपलीकडे नेले. 

लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल (५) आणि अरमान जाफर (९) ही सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतल्यामुळे मुंबई संकटात सापडली. सिद्धेश लाड (१६) आणि शिवम दुबेसुद्धा (४) छाप पाडू शकले नाहीत. मुलानीने साईराज पाटीलसह (४२) सहाव्या गड्यासाठी ६२ धावांची भर घालून मुंबईच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु ही जोडी बाद झाल्यावर मुंबईचा डाव २३६ धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक

तमिळनाडू : ५० षटकांत ८ बाद २९० (शाहरुख खान ६६, बाबा इंद्रजित ४५; धवल कुलकर्णी ३/४५) विजयी वि. मुंबई : ४६.४ षटकांत सर्व बाद २३६ (शाम्स मुलानी ७५, साईराज पाटील ४२; वॉशिंग्टन सुंदर ३/६०)

’ गुण : तमिळनाडू ४, मुंबई ०