मुंबई संघातून सिद्धेशला डच्चू

संकटमोचक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धेश लाडला आगामी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईच्या संघातून वगळण्यात आले आहे. प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यरकडे मुंबईच्या संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून युवा सलामीवीर पृथ्वी शॉ उपकर्णधारपद भूषवणार आहे.

एकदिवसीय प्रकारात खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेला शनिवार, २० फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून रमेश पोवार यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या मुंबई संघात २२ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. जानेवारीत झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत सिद्धेशने अनुक्रमे ४, २१, ०, २ अशा धावा केल्या. त्यामुळेच त्याला संघात स्थान लाभलेले नाही. मुश्ताक अली स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र खांद्याच्या दुखापतीतून श्रेयस आता सावरल्याने तो पुन्हा मुंबईचे नेतृत्व करणार आहे. २०१८-१९मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली मुंबईने ही स्पर्धा जिंकली होती.

मुंबईचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर, आदित्य तरे, सर्फराज खान, चिन्मय सुतार, हार्दिक तामोरे, शिवम दुबे, आकाश पारकर, आतिफ अत्तरवाला, शाम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, साईराज पाटील, सुजित नाईक, तनुष कोटियन, प्रशांत सोलंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, सिद्धार्थ राऊत, मोहित अवस्थी.