Vijay Hazare Trophy 2025-26 Live Streaming: भारताची सर्वात मोठी देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६, उद्या म्हणजेच २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यावर्षी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीम इंडियाचे अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. रोहित शर्मा मुंबईकडून तर विराट कोहली दिल्लीकडून खेळताना दिसू शकतो. रोहित व विराट खेळत असलेले सामने किती वाजता सुरू होणार व कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.
विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात देशभरात तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणाऱ्या एलिट ग्रुप, प्लेट ग्रुप आणि नॉकआउट फेऱ्यांचा समावेश असेल. स्पर्धेचा अंतिम सामना १८ जानेवारी रोजी खेळवला जाईल. तर स्पर्धेतील पहिला सामना २४ डिसेंबर २०२५ ला खेळवला जाणार आहे. प्रत्येक संघ यामध्ये ७ सामने खेळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफीचे सामने कुठे लाईव्ह पाहता येणार?
विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीचा सामना उद्या २४ डिसेंबरला आंध्रविरूद्ध होईल. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. त्याच दिवशी मुंबईचा सामना सिक्कीम संघाविरूद्ध होईल. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०० वाजता सुरू होतील. तर नाणेफेक सकाळी ८:३० वाजता होईल.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये या हंगामात एकूण ११९ सामने खेळवले जातील. स्पर्धेतील सर्व सामने दूरदर्शनवर दाखवले जाणार नाहीत. काही निवडक सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर टीव्हीवर थेट पाहता येतील. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या निवडक सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टार अॅपवर पाहता येणार आहे.
रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमधील कोणकोणते सामने खेळणार?
रोहित शर्माचा मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला आहे आणि एमसीएने स्पष्ट केलं आहे की तो फक्त दोन सामन्यांसाठी उपलब्ध असेल. मुंबईचा पहिला सामना उद्या, २४ डिसेंबर रोजी सिक्कीमविरुद्ध आहे, ज्यामध्ये रोहित खेळताना दिसणार आहे. तर मुंबईचा पुढचा सामना २६ डिसेंबर रोजी उत्तराखंडशी होईल. स्पर्धेतील हा रोहितचा दुसरा सामना असणार आहे.
विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमधील कोणकोणते सामने खेळणार?
रोहित शर्माप्रमाणे विराट कोहलीही पहिले दोन सामने खेळेल. दिल्लीचा पहिला सामना २४ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशविरुद्ध आणि दुसरा सामना २६ डिसेंबर रोजी गुजरातविरुद्ध आहे. विराट कोहली दोन्ही सामन्यांमध्ये खेळणार आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, तो दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफी खेळणार आहे.
