विजय हजारे करंडक स्पर्धेत आज बलाढ्य तमिळनाडूशी सलामी

स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर आणि आदित्य तरे या पंचतारांकित खेळाडूंच्या अनुपस्थितीत गतविजेता मुंबईचा संघ जेतेपद कायम राखण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

डावखुरा फिरकीपटू शाम्स मुलानी मुंबईचे नेतृत्व करणार असून बुधवारी त्यांची ब-गटातील पहिल्याच लढतीत बलाढ्य तमिळनाडूशी गाठ पडणार आहे. एकूण ३८ संघांत होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येकी सहा संघांना पाच एलिट गटात विभागण्यात आले असून प्लेट गटात उर्वरित आठ संघांचा समावेश आहे. मुंबईच्या गटात तमिळनाडूव्यतिरिक्त कर्नाटक, बंगाल, बडोदा, पुदुच्चेरी या संघाना स्थान देण्यात आले आहे.

यशस्वी जैस्वालवर मुंबईच्या फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त असून त्याला अरमान जाफरची साथ लाभणे गरजेचे आहे. जैस्वाल आणि जाफर यांच्या जोडीने नुकतेच २५ वर्षांखालील स्पर्धेत दोन वेळा शतकी सलामी नोंदवली होती. त्याशिवाय सिद्धेश लाड, शिवम दुबे, हार्दिक तामोरे, आकर्षित गोमेल यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल.

गोलंदाजीत धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी या वेगवान त्रिकुटाकडून मुंबईला चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. तमिळनाडूने नुकताच विजय शंकरच्या नेतृत्वाखाली मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या जेतेपदावर दुसऱ्यांदा नाव कोरले. त्यामुळे त्यांना जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.

ऋतुराजकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

उदयोन्मुख फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे विजय हजारे स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व सोपवण्यात आले असून राहुल त्रिपाठी उपकर्णधारपद सांभाळणार आहे. महाराष्ट्राची बुधवारी मध्य प्रदेशशी गाठ पडणार आहे.

’ महाराष्ट्राचा संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, यश नाहर, नौशाद शेख, अझिम काझी, अंकित बावणे, शाम्सशुझमा काझी, मुकेश चौधरी, प्रदीप दाढे, मनोज इंगळे, आशय पालकर, दिव्यांग हिंगणेकर, जगदीश झोपे, स्वप्निल फुलपागर, अवधूत दांडेकर, तरणजित सिंग ढिल्लोन, सिद्धेश वीर, यश क्षीरसागर, पवन शहा, धनराज परदेशी.

मुंबईत ११ सामन्यांचे आयोजन

विजय हजारे स्पर्धेतील अ-गटाच्या ११ सामन्यांचे आयोजन मुंबईत करण्यात येणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील अ-गटात विदर्भ, आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, ओदिशा, जम्मू आणि काश्मीर या सहा संघांचा समावेश आहे. त्यापैकी वांद्रे-कुर्ला संकुल येथे पाच, ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे पाच आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक लढत खेळवण्यात येईल. विदर्भाचे हिमाचल आणि ओदिशाविरुद्धचे सामने चाहत्यांना दादोजी कोंडदेव स्टेडियमवर पाहायला मिळतील.

अष्टपैलू हार्दिक मुकणार

नवी दिल्ली : भारत आणि बडोद्याचा अष्टपैलू हार्दिक पंड्या बुधवारपासून सुरू होत असलेल्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेला मुकणार आहे. सातत्याने गोलंदाजी करण्यास आवश्यक तंदुरुस्ती प्राप्त करण्यासाठी सध्या तो मुंबई येथे मेहनत घेत आहे. ‘‘बडोदा क्रिकेट संघटनेने (बीसीए) इ-मेल पाठवत हार्दिकला विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळण्याबाबत विचारणा केली. त्याने मागील काही वर्षांत बडोद्याकडून फारसे सामने खेळलेले नाहीत. मात्र, त्याने एका ओळीत उत्तर देताना सध्या मुंबईत तंदुरुस्तीवर मेहनत घेत असल्याची आम्हाला माहिती दिली,’’ असे ‘बीसीए’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. तसेच तो जायबंदी आहे का, असे विचारले असता ‘बीसीए’लाही याबाबत नक्की माहित नसल्याचे अधिकारी म्हणाला. हार्दिक मागील काही काळात सातत्याने गोलंदाजी करू शकलेला नसून फलंदाजीतही त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याने भारतीय संघातील स्थानही गमावले.