व्हीजेडी पद्धतीनुसार बंगालकडून ६७ धावांनी पराभव पत्करल्यामुळे गतविजेत्या मुंबईचे विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. शाम्स मुलानीच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाने एलिट ब-गटात साखळीमधील चार सामन्यांपैकी तीन सामने गमावल्यामुळे आता बाद फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा मावळल्या आहेत.
मुंबईने नाणेफेक जिंकल्यानंतर बंगालला प्रथम फलंदाजीची संधी दिली. बंगालने अनुस्तूप मजुमदार (११० धावा) आणि शाहबाझ अहमद (१०६ धावा) यांच्या शतकांच्या बळावर ५० षटकांत ७ बाद ३१८ धावा उभारल्या. मुंबईचा मध्यमगती गोलंदाज मोहित अवस्थीने ६३ धावांत चार बळी घेतले.




त्यानंतर, मुंबईने ४१ षटकांत ८ बाद २२३ धावा केल्या असताना पावसामुळे खेळ स्थगित करण्यात आला. त्यामुळे व्हीजेडी पद्धतीनुसार बंगालला ६७ धावांनी विजयी घोषित केले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने ३४ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ४९ धावा केल्या, तर अरमान जाफरने ४७, मुलानीने ३६ आणि शिवम दुबेने नाबाद २९ धावांचे योगदान दिले. बंगालच्या प्रदीप्ता प्रामाणिकने ३३ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
बंगाल : ५० षटकांत ७ बाद ३१८ (अनुस्तूप मजुमदार ११०, शाहबाझ अहमद १०६; मोहित अवस्थी ४/६३) विजयी वि. मुंबई : ४१ षटकांत ८ बाद २२३ (सूर्यकुमार यादव ४९, अरमान जाफर ४७; प्रदीप्ता प्रामाणिक ३/३३)