Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad has become the first batsman in the world to hit seven sixes in a single over Watch video | Loksatta

६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ

एका षटकात ७ षटकार मारणारा ऋतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे, त्याचबरोबर त्याने दुहेरी शतकही झळकावले.

६,६,६,६,६,६,६ … एका ओव्हरमध्ये ७ षटकार मारत ऋतुराज गायकवाडने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा व्हिडीओ
ऋतुराज गायकवाडने एका षटकात लगावले ७ षटकार.(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध १५९ चेंडूत नाबाद २२० धावांची खेळी केली. ज्यामध्ये १० चौकार आणि १६ षटकार लगावले. त्याने एकाच षटकात ७ षटकारांसह ४३ धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५ गडी गमावून ३३० धावा केल्या आहेत.

या स्पर्धेतील शेवटच्या ८ डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावता येतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग आहे. २५ वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे १३वे शतक आहे.

डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील ४९ वे षटक टाकत होता. त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला. अशाप्रकारे, त्याने एकाच षटकात ७ षटकार लगावत एकूण ४३ धावा केल्या. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार लगावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीला यूपीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ४१ धावांत २ विकेट गमावल्या होत्या. राहुल त्रिपाठी ९ आणि सत्यजीत ११ धावा करून बाद झाले. मात्र कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड एक बाजू सांभाळून खेळत राहिला. त्याने अंकित बावणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अंकित ५४ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – ODI World Cup 2023: ‘हिऱ्याच्या शोधात आपण सोने गमावले’; मोहम्मद कैफने विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला दिला इशारा

१०९ चेंडूत शतक पूर्ण केले –

ऋतुराज गायकवाडने १०९ चेंडूत शतक पूर्ण केले. तसेच १३८ चेंडूत १५० धावांचा टप्पा गाठला. म्हणजेच त्याच्या पुढच्या ५० धावा फक्त २९ चेंडूत आल्या. १५९ चेंडूत २२० धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने अझीम काझीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अझीम ४२ चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याचबरोबर कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ६६ धावांत ३ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 15:27 IST
Next Story
FIFA WC 2022: क्रिकेटच नाही तर फुटबॉलच्या मैदानातही सॅमसनची क्रेझ, संजूच्या समर्थनार्थ स्टेडियममध्ये झळकले बॅनर