Vijay Shankar Retirement from IPL: आयपीएल २०२६ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. प्लेऑफची शर्यत चांगलीच रंगतदार सुरू आहे. पण यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय अष्टपैलू खेळाडूने स्पर्धा सुरू असतानाच निवृत्तीची घोषणा केली आहे. हा खेळाडू स्पर्धेच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

आपल्या अष्टपैलू खेळीने स्पर्धेच्या इतिहासात छाप पाडलेल्या विजय शंकर याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने सोशल मीडियावर जाहीर केलं की, तो आता आयपीएल किंवा भारताकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणार नाही. आपली कारकीर्द पुढे नेण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. शंकर तामिळनाडूकडून देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे. विजय शंकरने आपल्या निवृत्तीच्या घोषणेदरम्यान, त्याला एक चांगला क्रिकेटपटू बनण्यास मदत केलेल्या प्रत्येकाचे आभार मानले.

आपल्या निवृत्तीची घोषणा करताना विजय शंकरने लिहिलं, “क्रिकेट हेच माझे जीवन आहे. मी वयाच्या १०व्या वर्षी खेळायला सुरुवात केली आणि २५ वर्षांनंतर मी प्रत्येक स्तरावर खेळलो आहे. माझ्या देशासाठी खेळणं हा माझ्यासाठी नेहमीच सर्वात अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असेल. मी देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मला क्रिकेट खेळणे सुरू ठेवता येईल. मला जे सर्वात जास्त आवडते ते करण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे आभार मानणं पुरेसं नाही. मी सदैव आभारी राहीन.”

विजय शंकरने आपल्या निवृत्तीच्या वेळी बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाचे आभार मानले. त्याने लिहिलं, “नागपूरमध्ये भारताच्या ५०० व्या एकदिवसीय सामन्यात शेवटचं षटक टाकणं आणि २०१९ विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर पहिली विकेट घेणं, हे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन. माझ्या आयपीएल संघांचे, म्हणजेच गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स यांचे विशेष आभार.”

टीएनसीएचे U13, U15, U17, U19, U22, U25 आणि अखेरीस वरिष्ठ संघ मी माझ्या आयुष्यातील बहुतेक काळ त्यांच्यासोबत घालवला आहे. प्रत्येक टप्प्यावर मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार. विजय शंकरने त्याचे सर्व प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, ट्रेनर्स, ग्राऊंड्समन, मीडिया आणि मित्रांचेही आभार मानले.

विजय शंकरने भारतासाठी १२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१.८ च्या सरासरीने २२३ धावा केल्या. त्याने नऊ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २५ पेक्षा जास्त सरासरीने १०१ धावा देखील केल्या. प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये, शंकरने १३ शतकांसह ४,२५३ धावा जमवल्या. लिस्ट ए मध्ये, त्याने दोन शतकांसह २,७९० धावा केल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, त्याने १२ अर्धशतकांसह २,५८३ धावा केल्या.