शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला भारतीय संघाची दार खुली झाली. लोकेश राहुलला सलामीच्या जागेवर बढती मिळाल्यानंतर चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी विजय शंकरचा विचार करण्यात आला. विजय शंकरनेही आपल्यावर दाखवण्यात आलेल्या विश्वासाचं सोनं करुन दाखवलं आहे.

भारतीय संघ गोलंदाजी करत असताना, पाचव्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे भुवनेश्वरच्या षटकातील उरलेले दोन चेंडू टाकण्यासाठी विजय शंकरने चेंडू हातात घेतला. यावेळी आपल्या पहिल्याच चेंडूवर विजय शंकरने पाकिस्तानच्या इमाम उल-हकला माघारी धाडलं.

यानंतर विजय शंकरने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदचा त्रिफळा उडवत भारताची बाजू सामन्यात वरचढ करुन दिली. स्पर्धेला सुरुवात होण्याआधी विजय शंकरच्या निवडीवरुन अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र विजयने आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवत आपली निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं आहे.