भारताचा अव्वल बॉक्सर विजेंदर सिंग तापाने फणफणला असला तरी त्याने जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात स्वीडनच्या हॅम्पस हेन्रिकसन याचा ३-० असा धुव्वा उडवत थाटात सुरुवात केली.
२००९मध्ये याच स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा एकमेव भारतीय बॉक्सर ठरलेल्या विजेंदरने हा सामना ३०-२७, ३०-२६, ३०-२६ असा जिंकला. उत्तेजक प्रकरणात गोत्यात आलेल्या विजेंदरने त्यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय विजयाची नोंद केली. भारतासाठी सलग तिसरा दिवस विजयाचा ठरला.
‘‘कझाकस्तानमध्ये दाखल झाल्यानंतरच मला थंडी भरून ताप आला होता. तसेच कफ आणि खोकल्याच्या त्रासाने बेजार होतो. दोन दिवसांपासून मी त्यावर उपचार करवून घेत आहे. अशा परिस्थितीतही मी विजयश्री खेचून आणली. ही सुरुवात असली तरी अजून बऱ्याच आव्हानांचा मला सामना करायचा आहे,’’ असे विजेंदरने सांगितले.
शनिवारी होणाऱ्या पुढील फेरीत विजेंदरला खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. युरोपीयन विजेता आणि जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या आर्यलडच्या जेसन किगलीचे आव्हान त्याला पेलावे लागणार आहे.