भारतीय बॉक्सर्स विकास कृष्णनला स्ट्रँडजा स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पध्रेत दुहेरी आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे झालेल्या या स्पध्रेत विकासने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आणि त्याला स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही गौरवण्यात आले. भारतीय खेळाडूला पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे.

२६ वर्षीय विकासने अंतिम फेरीत जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतील कांस्यपदक विजेत्या ट्रॉय इस्लीचा पराभव केला. गतवर्षीच्या आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतील कांस्यपदकानंतर विकासचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक ठरले. हाताला दुखापत होऊनची विकासने सातत्यपूर्ण खेळ करत सुवर्णपदक पटकावले. ‘‘हे माझ्यासाठी जबरदस्त पुनरागमन आहे. मी तंत्र आणि सहनशक्ती यावर भरपूर मेहनत घेतली. हाताची दुखापत हाही प्रश्न मला काही काळ सतावत होता, परंतु त्यावरही मात करण्यात यश मिळवले. त्यामुळे सर्व काही माझ्या मनासारखे होत आहे,’’ असे विकास म्हणाला.

भारताच्या अमित पांघलनेही ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. या स्पध्रेत भारताने एकूण ११ पदकांची कमाई केली आणि त्यात दोन सुवर्ण, तीन रौप्य व सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.