वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दोन वेळचा ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू व्हिक्टर ॲक्सल्सेनने वयाच्या ३२ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. गेल्या काही काळापासून दुखापतींनी त्रस्त असलेल्या ॲक्सेल्सेनने ‘शरीरच आता थांबायला सांगत आहे,’ असे म्हणत बॅडमिंटनला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला.

ॲक्सल्सेन पाठीच्या त्रासामुळे गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर आहे. या त्रासामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती आणि त्यानंतर तो तीव्र वेदनांनी त्रस्त होता. तीन वेळचा युरोपीय विजेता असलेल्या ॲक्सल्सेन याने ‘बॅडमिंटन युरोप’शी बोलताना बुधवारी निवृत्तीच्या निर्णयाची घोषणा केली. ‘‘गेल्या काही काळापासून पाठीच्या दुखण्याशी झुंज देत आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणि दीर्घ पुनर्वसन प्रक्रियेतून गेल्यानंतरही, दुर्दैवाने ऑक्टोबरमध्ये मला पुन्हा त्रास सुरू झाला. तेव्हापासून आवश्यक असलेल्या पातळीवर खेळणे किंवा सराव करणे शक्य झाले नाही. वेदनांमुळे मी सराव करू शकलो नाही आणि म्हणूनच मला हा अत्यंत कठीण निर्णय घेण्यास भाग पडले,’’ असे ॲक्सल्सेन म्हणाला.

ॲक्सल्सेनने सलग १८३ आठवडे जागतिक क्रमवारीत अग्रस्थान राखले होते. दम्यासारख्या आजाराचा सामना करत ॲक्सल्सेनने टोक्यो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग सुवर्णपदके जिंकली. तसेच २०१७ व २०२२ मध्ये तो जगज्जेता ठरला. याशिवाय युरोपीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या डेन्मार्क संघाचा तो सहा वेळा भाग होता.

ज्या सर्जनने माझ्यावर गेल्या वर्षी शस्त्रक्रिया केली आणि ज्या डॉक्टरांकडे मी उपचार घेत होतो, त्यांच्याशी सल्लामसलत करूनच निवृत्तीचा निर्णय घेतल्याचेही ॲक्सल्सेन म्हणाला. ‘‘डॉक्टरांचे म्हणणे आहे की मला सध्या ज्या वेदना होत आहेत, त्या पाहता पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल आणि ती यशस्वी झाली नाही, तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत, मला हव्या त्या पातळीवर खेळता आले नसते. मला डॉक्टरांचा सल्ला मानणे आवश्यक वाटते,’’ असेही ॲक्सल्सेन म्हणाला. त्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये डेन्मार्क खुल्या स्पर्धेत अखेरचा सहभाग घेतला होता.

महान खेळाडूंपैकी एक-लक्ष्य

बॅडमिंटन जगतातील आजवरच्या महान खेळाडूंपैकी एक म्हणून ॲक्सल्सेन नेहमी स्मरणात राहील, अशा शब्दांत भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘‘बॅडमिंटनला तुझ्यासारखा खेळाडू लाभला हे या खेळाचे भाग्य आहे. तू फक्त एक महान विजेता म्हणूनच नाही, तर एक उत्तम व्यक्ती म्हणूनही ओळखला जाशील. सामने आणि पदकांपेक्षा तुझे व्यक्तिमत्त्व अधिक मोठे आहे,’’ असेही लक्ष्यने म्हटले आहे.