Vinesh Phogat Slams Brij Bhushan Sharan Singh Legal Battle: कुस्तीपटू विनेश फोगाटने मंगळवारी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली. भारतीय कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते, पण या प्रकरणी कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी बोलताना विनेश फोगाटने सिंह यांना “गुंड आणि गुन्हेगार” संबोधत, त्यांच्याविरोधातील कायदेशीर लढा सर्वोच्च न्यायालयात सुरूच ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं.

३१ वर्षीय विनेशने जींद येथे एका राजकीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने काही आठवड्यांपूर्वी सिंह यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, तक्रारदारांनी या निर्णयाला आव्हान दिलं आहे. “बृजभूषण कोण आहे? त्याला विसरा. तो गुंड आणि गुन्हेगार आहे. आपण त्या व्यक्तीला एवढा सन्मान का द्यायचा?” असं विनेशने म्हटलं.

ती पुढे म्हणाली, “गोंडामध्ये किती लोकांना त्रास दिला गेला आहे? त्याने किती जमिनींवर अतिक्रमण केलं आहे? आम्ही ही लढाई सर्वोच्च न्यायालयात लढू आणि ती पुढे घेऊन जाऊ. तो हेलिकॉप्टरमधून कुठे फिरतो? एवढा पैसा त्याच्याकडे कुठून आला?”

हेही वाचा

विनेश फोगट पुढील कायदेशीर लढाईसाठी सज्ज

या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर महिला कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह आघाडीच्या कुस्तीपटूंनी २०२३ मध्ये बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर सुरू झालेली मोठी कायदेशीर लढाई आहे. या कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आणि पुढे आरोपपत्रही दाखल केलं.

मे २०२४ मध्ये राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने पाच महिला तक्रारदारांशी संबंधित लैंगिक छळ आणि महिलांच्या विनयभंगाच्या आरोपांवर सिंह यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसा आधार असल्याचं म्हटलं होतं. तसेच दोन कुस्तीपटूंशी संबंधित गुन्हेगारी धमकीचे आरोपही निश्चित करण्यात आले होते. मात्र, सिंह यांनी सर्व आरोप फेटाळत आपण निर्दोष असल्याचं सांगितलं होतं.

३ ऑगस्ट २०२६ रोजी याच न्यायालयाने बृजभूषण सिंह आणि WFIचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली. या निकालासंदर्भातील वृत्तांनुसार, आरोप वाजवी संशयापलीकडे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने म्हटलं. तसेच हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि बनावट असल्याचं दिसत असल्याचंही न्यायालयाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आलं. या निकालानंतर विनेश फोगट आणि इतर कुस्तीपटूंनी हा निर्णय स्वीकारण्यास नकार दिला असून, न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे.