नवी दिल्ली : अनुभवी कुस्तीपटू विनेश फोगटला स्पर्धाविरहित काळात उत्तेजक चाचणी चुकल्याबद्दल आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेने (आयटीए) नोटीस बजावली आहे. आपल्या ठावठिकाणाबाबत माहिती देण्यात विनेशला अपयश आले असून, गेल्या १२ महिन्यांतील विनेशची ही पहिलीच चूक ठरली आहे.
ही नोटीस म्हणजे उत्तेजक विरोधी नियमांचे उल्लंघन नसून, ठावठिकाणा कलमांतर्गत दिलेला एक इशारा आहे. खेळाडू अचानक केल्या जाणार्या चाचणीसाठी नेहमी उपलब्ध राहावेत, या हेतूने हे नियम बनवण्यात आले आहेत. संयुक्त कुस्ती महासंघ (यूडब्ल्यूडब्ल्यू) आणि जागतिक उत्तेजक प्रतिबंध संस्था (वाडा) यांच्या नियमांनुसार, एका वर्षात तीन वेळा चाचणी चुकवणे किंवा ठावठिकाणा कळवण्यात अपयशी ठरल्यास, ते उत्तेजक सेवन विरोधातील नियमांचे उल्लंघन मानले जाते आणि त्यासाठी दोन वर्षांपर्यंतच्या निलंबनाची तरतूद असू शकते.
विनेशकडून ही चूक निष्काळजीपणामुळे झालेली नाही. त्यामुळे याची चुकलेली चाचणी म्हणून नोंद केली जाईल, असे विनेशला पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे. ही चूक निष्काळजीपणे झाल्याचे विनेशने सात दिवसांत सिद्ध करावे अन्यथा ही कारवाई अंतिम राहील, असेही पुढे म्हणण्यात आले आहे.
अधिवेशनासाठी उपस्थितीचे कारण
गेल्या वर्षी १८ डिसेंबरला नियमानुसार ६० मिनिटांच्या कालावधीत विनेश चाचणीसाठी उपलब्ध होऊ शकली नाही. विनेशचा चाचणीसाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. अशा नोंदणीकृत खेळाडूंना सकाळी ६ ते रात्री ११ या दरम्यानचा एक तासाचा असा वेळ निश्चित करावा लागतो, ज्यामध्ये ते विनासूचना चाचणीसाठी उपलब्ध असावे लागतात. या संदर्भात विनेशकडून स्पष्टीकरण मागावण्यात आले होते. तेव्हा विनेशने हरियाणा विधानसभेच्या अधिवेशनासाठी उपस्थित असल्याचे सांगितले होते.
