वृत्तसंस्था, नवी दिल्ली

विनेश फोगटचे आंतरराष्ट्रीय कुस्तीतील पुनरागमन लांबणीवर पडले आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर विनेश शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी झाली. मात्र, ५३ किलो वजनी गटात सुरुवातीच्या झुंजीनंतर उपांत्य फेरीत तिला मीनाक्षी गोयतकडून ४-६ असा पराभव पत्करावा लागला.

पॅरिस ऑलिम्पिकमधील कटू अनुभवानंतर राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान मिळवण्याच्या विनेशच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. ‘‘मी अपयशी ठरले असे मला वाटत नाही. मी संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध लढत होते. प्रत्येक पायरीवर मला संघर्ष करावा लागला. मला योग्य वागणूक मिळाली नाही. अर्थात, माझ्याशी लढलेल्या खेळाडूंबद्दल माझ्या मनात कोणताही आकस नाही. निवड चाचणीत हार पत्करावी लागली असली, तरी मी पुन्हा जोरदार पुनरागमन करेन,’’ असे विनेशने क्रीडा संकुल सोडण्यापूर्वी सांगितले.

नाट्यमय सुरुवात

पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीतील दुर्दैवी अपात्रतेनंतर विनेश पहिल्यांदाच मॅटवर परतली होती. मात्र, दिवसाची सुरुवातच तिच्यासाठी नाट्यमय झाली होती. अधिकृत वजन मोजणीदरम्यान विनेशला सुरुवातीला ५० किलो वजनी गटातच खेळण्याची परवानगी देण्यात आली. याच गटात तिने पॅरिस ऑलिम्पिकसह तिच्या शेवटच्या चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या होत्या. यावर विनेशने तीव्र आक्षेप घेतला आणि भारतीय कुस्ती महासंघावर भेदभावाचा आरोप केला. यानंतर महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी मध्यस्थी करत तिला ५३ किलो वजनी गटाच्या चाचणीत भाग घेण्याची परवानगी दिली. वजन मोजणीत ५३.९ किलो वजन भरल्यानंतर विनेशचा गटात समावेश करण्यात आला.

वादग्रस्त उपांत्यपूर्व लढत

विनेशने पहिल्या सामन्यात ज्योतीवर ७-१ असा सहज विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर, उपांत्यपूर्व फेरीत अत्यंत आक्रमक आणि तंत्रकुशल निशू कुमारीविरुद्ध शेवटी ६-६ अशा बरोबरीला विनेशला निर्णायक गुण मिळाला आणि तिने हा सामना ७-६ असा जिंकला.

विनेशची दमछाक

या भावनिक आणि थकवणार्‍या सामन्याचा विनेशवर परिणाम झाला. गेल्या काही महिन्यांत ती स्पर्धात्मक कुस्तीपासून दूर असल्याचाही फटका तिला बसला. उपांत्य फेरीत मीनाक्षीविरुद्ध खेळताना तिला तोच वेग आणि आक्रमकता राखता आली नाही. अखेर ती ४-६ अशी पराभूत झाली. मीनाक्षीने अत्यंत संयमाने कुस्ती करताना दमलेल्या विनेशची अधिक दमछाक केली आणि बचाव भक्कम ठेवत विजय मिळवला.