पुणे : निवृत्तीचा निर्णय मागे घेत तब्बल २० महिन्यांनी कुस्तीच्या मॅटवर पुनरागमन करणार्या विनेश फोगटचे आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) आपल्या निवड चाचणीतच बदल केल्यामुळे विनेश आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळू शकणार नाही.

शिवाय २३ वर्षांखालील गटातील कुस्तीगिरांनाही चाचणीत भाग घेणे अवघड जाणार आहे.

‘डब्ल्यूएफआय’ने १० ते १२ मे दरम्यान गोंडा येथे राष्ट्रीय मानांकन कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील पदकविजेत्यांचा आशियाई पात्रता स्पर्धेसाठी विचार केला जाणार होता. मात्र, आता ‘डब्ल्यूएफआय’ने आशियाई स्पर्धेसाठी पात्रता निकषातच बदल केल्यामुळे या स्पर्धेच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी प्रवास, निवास, भोजन असा सर्व खर्च सहभागी मल्लांनाच करायचा आहे. महासंघाने केवळ या सर्व संलग्न संघटनांना तेथील उपलब्ध धर्मशाळांच्या नावांची यादी पाठवली आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार सर्व मल्लांना नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायची असल्याचे समजते.

पॅरिस ऑलिम्पिकनंतर विनेशने निवृत्ती घेतली होती. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून तिने पुनरागमनाचा निर्णय घेतला. संयुक्त आंतरराष्ट्रीय महासंघ आणि ‘डब्ल्यूएफआय’ यांच्या नियमानुसार वेळेत निवृत्ती मागे घेण्याची प्रक्रिया विनेशकडून पार पाडण्यात आली. त्यानंतर अनेक प्रयासानंतर मानांकन स्पर्धेसाठी विनेशचे नाव नोंदवले गेले.

उत्तेजक सेवन प्रतिबंध संस्थेची प्रक्रिया देखील विनेशने पार पाडली. तिचा मानांकन स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, निकषच बदलल्यामुळे विनेश आता आशियाई स्पर्धेत खेळू शकणार नाही. परंतु ती पुन्हा एकदा जागतिक स्पर्धेचे ध्येय बाळगू शकते.

निकषात काय बदल?

गोंडा येथील राष्ट्रीय मानांकन कुस्ती स्पर्धेतील पदकविजेत्यांचा आशियाई पात्रता स्पर्धेसाठी विचार केला जाणार होता. मात्र, आता पात्रता निकष बदलण्यात आला आहे. बदलत्या निकषानुसार, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवडी चाचणीसाठी आता वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा (१२ ते १४ डिसेंबर २०२५), वरिष्ठ फेडरेशन स्पर्धा (१२ ते १४ फेब्रुवारी २०२६) आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धा (१० ते १२ एप्रिल २०२६) यातील पदकविजेत्यांनाच पात्र धरले जाईल. विनेश यापैकी एकाही स्पर्धेत सहभागी झाली नाही. त्यामुळेच विनेश आशियाई स्पर्धेत खेळू शकणार नाही.

२३ वर्षांखालील गटाची अडचण

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीची निवड चाचणी ३० आणि ३१ मे रोजी होणार आहे. मात्र, २३ वर्षांखालील गटातील मल्लांना या चाचणीत खेळणे अवघड जाऊ शकते. व्हिएतनाम येथे नियोजित २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धा २६ तारखेस संपणार आहे. त्यानंतर चारच दिवसांत भारतात येऊन चाचणीत सहभागी होणे युवा मल्लांसाठी आव्हानात्मक ठरेल. महासंघाने जे मल्ल २३ वर्षांखालील स्पर्धेतून माघार घेतील, त्यांना आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळणार नाही अशी सक्तीची अट घातली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवडीसाठी गोंडा येथे राष्ट्रीय मानांकन स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरली जाणार नाही. परंतु मानांकन स्पर्धेतील पदकविजेत्यांचा आगामी जागतिक आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी विचार केला जाईल. – ‘डब्ल्यूएफआय’ अधिकारी.