महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून महिला कुस्तीपटूंच्या लैगिंक छळाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. दीर्घकाळ सुरू असलेल्या कुस्ती व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षाला धक्कादायक वळण देत ऑलिम्पियन विनेश फोगाट हिने गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितलं की, माजी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याकडून लैंगिक छळ झालेल्या सहा महिला कुस्तीपटूंमध्ये तिचा स्वतःचाही समावेश आहे.

विनेशने भावनिक व्हीडिओ शेअर करत हा खुलासा तिने केला आहे. या मोठ्या प्रकरणात स्वतःला पीडित म्हणून सार्वजनिकपणे कबुली तिने दिली आहे. यापूर्वी तिने आपली ओळख गुप्त ठेवली होती. विनेशने सांगितलं की “काही विशिष्ट परिस्थितींमुळे” तिने हा खुलासा करण्याचा निर्णय घेतला. विनेशच्या मते, सध्याचा कुस्ती महासंघ २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी तिच्या पुनरागमनाला अडथळा आणण्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करत आहे.

बृजभूषण सिंह यांच्याविरुद्धचा कायदेशीर खटला सध्या न्यायालयात प्रलंबित असून, साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विनेश फोगाट यांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांनी आपली ओळख उघड न करता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ द्यायची होती. “सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पीडितेची ओळख उघड करू नये, कारण ते तिच्या सन्मान आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. पण आज काही परिस्थितींमुळे मला तुम्हा सर्वांना काही सांगायचं आहे. खटला अजून सुरू असताना बोलायचं मला नव्हतं… पण मी सांगू इच्छिते की तक्रार करणाऱ्या त्या सहा पीडितांपैकी एक मी स्वतः आहे आणि आमची साक्ष घेण्याची प्रक्रिया अजून सुरू आहेत.” असं विनेशने रविवारी, ३ मे रोजी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितलं.

२०२३ मध्ये नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात विनेश फोगाट या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होती, जिथे सर्वांनी मिळवून बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जोरदार आवाज उठवला होता.

“एका महिलेसाठी अशा परिस्थितीत स्पर्धेत उतरणं खूप कठीण असतं, आणि ज्यांनी अशा प्रसंगाचा सामना केला आहे, त्या प्रत्येक खेळाडूला हे समजू शकतं.” असं विनेश फोगाटने सांगितलं.

त्यांचं स्वतःचं खासगी महाविद्यालय आहे आणि ही स्पर्धा तिथेच आयोजित केली जात आहे. अशा ठिकाणी प्रत्येक मेहनती खेळाडूला योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा करणं खूप अवघड आणि जवळजवळ अशक्य आहे. कोणत्या सामन्याला कोण पंच असेल, किती गुण दिले जातील… हे सगळं बृजभूषण सिंह आणि त्यांच्या लोकांच्या नियंत्रणाखाली असेल आणि सरकार व क्रीडा मंत्रालय हे सगळं फक्त मूक प्रेक्षकासारखं पाहत आहेत.”

“तुम्ही कल्पना करू शकता, त्यांच्याच ठिकाणी, त्यांच्या स्वतःच्या महाविद्यालयात, जिथे प्रत्येकजण त्यांच्याशी संबंधित असेल… तिथे जाऊन अशा परिस्थितीत स्पर्धा करणं अत्यंत कठीण आहे. आणि अशा अवस्थेत मी तिथे जाऊन माझं १०० टक्के देऊ शकेन का, याबद्दलही मला शंका वाटते,” असं विनेश फोगाटने स्पष्ट केलं.