Vinesh Phogat Brij Bhushan Acquittal Reaction: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सोमवारी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केलं आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी बृजभूषण शरण सिंह आणि भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी सहसचिव विनोद तोमर यांची महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळ आणि धमकावल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला आरोप वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निकाल दिला.
‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रमुख बृजभूषण सिंह आणि इतर प्रशिक्षकांनी अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप भारतीय कुस्तीपटूंनी केला होता. याप्रकरणी जानेवारी २०२३ मध्ये जंतरमंतरवर विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक आघाडीच्या कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे दीर्घकाळ आंदोलन करत बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची, त्यांना WFI अध्यक्षपदावरून हटवण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. या आंदोलनाने देशभरात मोठं लक्ष वेधून घेतलं.
आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी एफआयआर दाखल केला. त्यानंतर तपास पूर्ण करून १५ जून २०२३ रोजी सुमारे १५०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. या प्रकरणात अनेक महिला कुस्तीपटूंनी न्यायालयात साक्ष दिली होती, तर बृजभूषण शरण सिंह यांनी सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळून लावले होते. अखेरीस या प्रकरणी आता दिल्लीतील कोर्टाने बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता केल्याने कुस्तीपटू विनेश फोगटने दु:ख व्यक्त केलं.
बृजभूषण सिंह यांची लैंगिक छळाच्या आरोपातून मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगट काय म्हणाली?
बृजभूषण शरण सिंह यांनी निर्दोष मुक्त केल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट हिची प्रतिक्रिया समोर आली आहे. विनेश फोगटने पोस्ट शेअर करत म्हटलं, “सत्ताधारी पक्षातील एका प्रभावशाली नेत्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं आणि त्यासाठी प्रचंड धैर्य दाखवावं लागलं. सत्ता आणि आपल्या प्रभावाच्या जोरावर बृजभूषण यांनी अनेक मुलींवर दबाव टाकून त्यांच्याकडून तक्रारी मागे घेण्यास भाग पाडलं.”
“मात्र, अनेक महिला कुस्तीपटू ठामपणे उभ्या राहिल्या आणि न्यायालयात बृजभूषण यांच्या विरोधात लढा देत राहिल्या. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमध्ये न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांना दोषी ठरवलं नाही, याचं आम्हाला अत्यंत दुःख आहे. सुरुवातीपासूनच संपूर्ण यंत्रणा, सरकार आणि व्यवस्था बृजभूषण यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं आम्हाला वाटत आहे.”
दिल्ली न्यायलयाच्या या निर्णयानंतर विनेश फोगटने पुढे काय पाऊल उचलणार, त्याची माहिती देखील तिच्या या पोस्टमध्ये दिली आहे. “महिला कुस्तीपटूंनी या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याचे निर्देश आपल्या वकिलांना दिले असून, ते शक्य तितक्या लवकर करण्यात येणार आहे. आम्ही आशा सोडलेली नाही आणि महिला कुस्तीपटूंचा हा लढा पुढेही सुरू राहील,” असं विनेश फोगटने सांगितलं.
