नवी दिल्ली : उच्च न्यायालयापाठोपाठ शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने देखील कुस्तीगीर विनेश फोगटच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीतील सहभागावर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या याचिकेसंदर्भात तिच्याकडून उत्तराची देखील मागणी केली आहे.

विनेशला सहभागी करुन घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला ‘डब्ल्यूएफआय’च्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आशियाई स्पर्धेसाठी महिलांची निवड चाचणी शनिवारी नवी दिल्ली येथे होणार आहे.

न्यायाधिश नरसिंहा आणि आलोक अराध्ये यांच्या खंडपीठाने या संदर्भातील याचिकेवर विनेशला सहभागी करुन घेण्याचा आदेश दिला. यापूर्वी अनेकदा देशाचे नाव उंचावलेल्या विनेशला निवड चाचणीपासून दूर ठेवणे योग्य नाही, असे म्हणताना न्यायालयाने क्रीडा क्षेत्रातील वादासंदर्भात सातत्याने होणार्‍या न्यायालयीन हस्तक्षेपाबाबत चिंता देखील व्यक्त केली. न्यायासाठी खेळाच्या संपूर्ण कार्यपद्धतीला वेठीस धरणे योग्य नाही, अशी टिप्पणी देखील न्यायालयाने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय ज्या पद्धतीने देण्यात आला, त्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायालयाने म्हटले आहे की, ‘‘क्रीडा प्रशासनातील अशा जलद हस्तक्षेपामुळे संपूर्ण क्रीडा प्रणाली कमकुवत होण्याचा धोका आहे.’’

विनेशची आजपर्यंतची कामगिरी लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने तिच्या आशियाई स्पर्धेच्या निवड चाचणीतील सहभागाला मंजूरी दिली असली, तरी ‘डब्ल्यूएफआय’ने दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात विनेशला उत्तर देण्यास सांगितले आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात होईल.

विनेशसमोर नवी अडचण

निवड चाचणीत विनेश ५३ किलो वजनी गटात सहभागी होण्याच्या तयारीत होती. न्यायालयाच्या आदेशानंतर ‘डब्ल्यूएफआय’ने तिला आवडत्या वजनी गटाबाबत विचारणा केली होती. मात्र, रात्री उशिरापर्यंत विनेशने कुठलाच प्रतिसाद न दिल्यामुळे महासंघाने तिला ५० किलो वजनी गटातून सहभागी होण्याची मंजुरी दिली.

महासंघाने कुस्तीगीरांना सहभागासाठी एका किलोची सलवत दिली आहे. त्यामुळे विनेशला आता ५० किलो वजनी गटातून सहभागी होण्यासाठी वजन ५१ किलोंपर्यंत कमी करावे लागणार आहे. दरम्यान, महासंघाने निवड चाचणीत राष्ट्रीय मानांकन स्पर्धेतील प्रत्येक पदक विजेत्यास सहभागी होण्यास मान्यता दिली आहे.

आदिती चौहान, सोमय्या निरीक्षक

भारताची माजी फुटबॉलपटू आदिती चौहान आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉकीपटू एम.एम. सोमय्या यांची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शनिवारी होणार्‍या महिला कुस्ती निवड चाचणी स्पर्धेसाठी शासकीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे, तर सोमय्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने चाचणीला उपस्थित राहतील.