क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. जगभरातून मास्टर ब्लास्टरवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन तेंडुलकरचा हा ५३वा वाढदिवस सचिनचा खास मित्र विनोद कांबळीने सचिनला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. विनोद कांबळीच्या सेलिब्रेशनचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि ज्याच्यासोबत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली, त्या विनोद कांबळीनेही शुभेच्छा दिल्या. कांबळीने सचिन तेंडुलकरला त्याच्या वाढदिवसानिमित्त एका खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सचिनबद्दल कांबळीचे प्रेम आणि आदर स्पष्टपणे दिसून येतो.

या व्हायरल व्हिडिओमध्ये विनोद कांबळी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर दिसत आहेत. हे तेच मैदान आहे जिथे कांबळी आणि सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. व्हिडिओमध्ये कांबळी सचिनला शुभेच्छा देताना म्हणतात, “पार्टनर, आजचा दिवस उत्सवाचा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, पार्टनर.” कांबळी पुढे म्हणतात, “आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे. मला दरवर्षी २४ एप्रिलला माझा पार्टनर सचिन तेंडुलकरची आठवण येते. आमच्या सुरुवातीच्या दिवसांतील अनेक सुंदर आठवणी आहेत एकत्र वाढदिवस साजरा करणं आणि एकत्र मैदानावर वर्चस्व गाजवणं. हे आमचं नातं अतूट आहे.”

विनोद कांबळीचा हा व्हीडिओ खरंतर दिनशॉ आईस्क्रिम ब्रँडचा व्हीडिओ आहे. ज्यामध्ये शिवाजी पार्कमध्ये मुलांना आणि इतर अनेकांना या निमित्ताने आईस्क्रिम देण्यात आले होते. विनोद कांबळी गेल्या काही काळापासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत. गेल्या वर्षी, कांबळी यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते अशक्त दिसत होते आणि त्यांना चालताना त्रास होत होता. या व्हिडिओनंतर, क्रिकेट चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं होतं.

अलीकडेच कांबळीच्या प्रकृतीबाबत अशीच बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, या कठीण काळात आपल्या मित्राला मदत करण्यासाठी सचिन तेंडुलकर पुढे आला आहे. कांबळीचा मित्र मार्कस कुटोने त्याला आर्थिक आणि भावनिक आधार देण्यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. अनेक माजी क्रिकेटपटू आणि हितचिंतकांचा समावेश असलेल्या या ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकरही सामील आहे. सचिन पडद्यामागून विनोद कांबळीला मदत करत आहे.