Vinod Kambli Video Viral : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली आहे. २००० च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा असणाऱ्या या खेळाडूला मद्यप्राशन करण्याचं व्यसन जडलं आणि त्यात त्याने सर्वकाही गमावलं. विनोद कांबळीला आता धड चालताही येत नसल्याचं या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. एकेकाळी कोट्यवधी रुपयांचा मालक असणारा विनोद कांबळी आता दिवाळखोर झाला आहे. दुसऱ्या बाजूला अनेक आजारांनी डोकं वर काढलं आहे. त्याची परिस्थिती इतकी दयनीय झालीय की त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाहीये. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की विनोद कांबळी स्वतःच्या पायावर उभाही राहू शकत नाहीये. उभा राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या विनोदने एका दुचाकीचा आधार घेतला. तरीदेखील त्याचा तोल जात होता. त्यानंतर त्याच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला आधार दिला व उचलून बाजूला नेलं. विनोद कांबळीचा असाच एक व्हिडीओ यापूर्वी देखील व्हायरल झाला होता. यामध्ये विनोद हात जोडून विनंती करत होता की माझ्याकडे काम नाही, त्यामुळे घर चालवणं देखील कठीण झालं आहे. हे ही वाचा >> Vinesh Phogat: विनेश फोगट उपांत्य फेरीत, अवघ्या पाऊण तासात दोन बड्या कुस्तीपटूंना दिला धोबीपछाड, पाहा VIDEO सचिनला मदतीचं आवाहन विनोद कांबळीची ही अवस्था पाहून काही नेटीझन्सनी त्याचा बालपणीचा मित्र आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला या व्हिडीओवर टॅग करून कांबळीची मदत करण्याचं आवाहन केलं आहे. व्हिडीओ शेअर करत एका युजरने म्हटलं आहे, "विनोद कांबळीची ही अवस्था पाहून मन हेलावून गेलं. तो एक जबरदस्त खेळाडू होता. त्यानेही त्याचा मित्र सचिन तेंडुलकरसारखं आयुष्य जगायला हवं होतं. तो खूप मोठा झाला असता, मात्र आता त्याची अवस्था वाईट आहे. तो पूर्णपणे बरा व्हावा यासाठी मी प्रार्थना करतो." हे ही वाचा >> Priyanka Goswami: ऑलिम्पिकला जाऊन रिल बनविणारी प्रियांका गोस्वामी ट्रोल; ४५ खेळाडूंमध्ये आला ४१ वा क्रमांक एका युजरने कमेंट केली आहे की "दारूमुळे विनोद कांबळीची अशी अवस्था झाली आहे. दारूनेच त्याला देशोधडीला लावलं. सचिन तेंडुलकरजी तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या." दुसऱ्या एका युजरने सचिनला विनंती केली आहे की "तुझा मित्र खूप आजारी आहे. जुन्या सर्व गोष्टी विसरून त्याची मदत कर."व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कधीचा आहे याची अधिकृत माहिती नाही.