Vinod Kambli old age home viral video truth and health update: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा चर्चेत आला आहे. विनोद कांबळींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्यामध्ये तो एका वृद्धाश्रमात दिसत आहे. विनोद कांबळी या व्हिडिओमध्ये वृद्धाश्रमाबद्दल बोलताना दिसत आहे. कांबळीला अशा अवस्थेत पाहून अनेक क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये कांबळी स्वतः वृद्धाश्रमातील सुविधा आणि प्रसन्न वातावरणाचं कौतुक करताना दिसत आहे. पण विनोद कांबळी किती दिवसांपासून तिथे आहे आणि काय ट्रीटमेंट सुरू आहे, जाणून घेऊया.
विनोद कांबळी ‘निदान द मुक्ती’ या वृद्धाश्रमात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या NGOचे संस्थापक महेश नाईक यांनी सांगितलं की, कांबळी त्यांच्यासाठी ‘हिरो’ आहे आणि त्याला हवं तितके दिवस पूर्णपणे मोफत तिथे राहता येईल.
विनोद कांबळी यांच्यावर कोणते उपचार सुरू होते?
ETV भारतशी बोलताना नाईक म्हणाले, “विनोद कांबळी गेल्या वर्षी आमच्या संस्थेत दाखल झाला होता आणि जवळपास पाच ते सहा महिने आमच्यासोबत राहिला. आम्ही त्याला फिजिओथेरपी आणि इतर आवश्यक उपचार दिले. तो जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे आला, तेव्हा त्याच्यात साधं उभं राहण्याइतकीही ताकद नव्हती. मात्र, उपचारांना त्याने खूप चांगला प्रतिसाद दिला.”
महेश नाईक पुढे म्हणाले, “यावेळी विनोद कांबळी आमच्याकडे आला तेव्हाही आम्ही त्याला आवश्यक फिजिओथेरपी दिली. त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यामुळे त्याच्यावर उपचार करताना आम्हाला अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. आता त्याची पत्नी त्याला घरी घेऊन गेली आहे.”
विनोद कांबळी नेमकं झालंय तरी काय?
नाईक यांनी पुढे सांगितलं, “जेव्हा तो आमच्यासोबत असतो, तेव्हा तो नेहमी आनंदी आणि उत्साही असतो. खरं तर, ज्या आकृती हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते, त्यांनीच त्याला आमच्याकडे पाठवलं होतं. “विनोद कांबळी आमच्यासाठी हिरो आहे. त्याला आयुष्यभरात जेव्हा कधी आमच्याकडे राहावंसं वाटेल, तेव्हा तो हवं तितके दिवस इथे राहू शकतो, तेही पूर्णपणे मोफत. त्याच्या उपचारांचा खर्चही आम्हीच उचलू. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आमच्या हिरोप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळतेय, याचा आम्हाला आनंद आहे.”
कांबळीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली, तर अनेकजण तो निरोगी आणि दीर्घायुषी राहावा, यासाठी प्रार्थना करत आहेत. गेल्या काही काळापासून विनोद कांबळी आजारपण, आर्थिक अडचणी आणि वैयक्तिक समस्यांमुळे चर्चेत आहे. याआधीही त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओंमध्ये त्याला आधाराशिवाय चालणंही कठीण जात असल्याचं दिसत होतं. ते पाहून भारतीय क्रिकेट चाहते मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करत होते.
