भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण या व्हिडीओत विनोद कांबळी निदान नावाचा वृद्धाश्रम आणि केअर सेंटर या ठिकाणी असल्याचं दिसून येतं आहे. एके काळच्या दिग्गज फलंदाजाची ही अवस्था पाहून सोशल मीडियावर असलेले क्रिकेट चाहते चिंता व्यक्त करत आहेत. ठाण्यातल्या निदान या केअर सेंटर आणि वृद्धाश्रमात आपण असल्याचं विनोदने म्हटलं आहे. तसंच आपली या ठिकाणी खूप चांगली काळजी घेत असल्याचंही त्याने म्हटलं आहे. विनोद कांबळीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय म्हटलं आहे विनोद कांबळीने व्हिडीओत?
आपण ठाण्यातल्या निदान या वृद्धाश्रमात आणि केअर सेंटरमध्ये आहोत असं विनोद कांबळीने म्हटलं आहे. तसंच माझा आजार आता नियंत्रणात आहे आणि या ठिकाणी असलेल्या सुविधा खूप चांगल्या आहेत. स्वच्छता आणि इथे असलेल्या लोकांची काळजी घेणं हे अतिशय चांगलं आहे. या ठिकाणी राहताना मला घरापासून दूर असल्यासारखं वाटत नाही. लोकांकडून मला खूप प्रेम आणि आदर मिळतो आहे. या आशयाची वाक्यं विनोद कांबळी तुटक तुटक आणि अडखळत बोलताना दिसतो आहे. या व्हिडीओने क्रिकेटच्या चाहत्यांची चिंता वाढवली आहे. प्रणव महाजन या क्रिकेट चाहत्याने विनोद कांबळीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. इंडिया टीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
विनोद कांबळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
विनोद कांबळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्याला असं पाहून दुःख व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी त्याची प्रकृती सुधारावी आणि त्याला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना केली आहे. विनोद कांबळीचा एक व्हिडीओ साधारण एक ते दीड वर्षापूर्वी व्हायरल झाला होता ज्यात त्याला नीट चालताही येत नव्हतं. त्यावेळीही त्याचे चाहते खूप दुःखी झाले होते. आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. विनोद कांबळीला केअर सेंटर आणि वृद्धाश्रमात पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही काळापासून विनोद कांबळी आर्थिक अडचणी आणि त्याच्या आजारपणामुळे चर्चेत आहे.
सचिन तेंडुलकराचा एकेकाळचा जिगरी मित्र अशी ओळख असलेल्या विनोद कांबळीने भारतासाठी १७ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने सुमारे ५४ च्या प्रभावी सरासरीने १,०८४ धावा केल्या आणि चार शतके झळकावली. तो सर्वात जलद १,००० कसोटी धावा करणारा भारतीय फलंदाजही आहे. अलीकडेच यशस्वी जैस्वाल हा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता, परंतु त्याने १६ डावांमध्ये हा पराक्रम केला. ज्यानंतर तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. एक दिवसीय सामन्यांमध्ये विनोद कांबळीने १०४ सामने खेळले. सुमारे ३२ च्या सरासरीने २,४७७ धावा केल्या. ज्यात दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांची जोडी ओपनिंगला येत असे. त्यावेळी त्यांची फलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट चाहते आनंदाने टीव्हीसमोर बसत असत. आता याच विनोद कांबळीची अशी अवस्था पाहून चाहत्यांची चिंता वाढली आहे.
