विनू मंकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत (१९ वर्षांखालील) महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत हरयाणाने महाराष्ट्रावर सहा गडी आणि सात चेंडू राखून मात केली.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राचा डाव ५० षटकांत १७२ धावांवर आटोपला. गर्ग सांगवान आणि विवेक कुमार यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवून महाराष्ट्राची एकवेळ ७ बाद ६२ धावा अशी अवस्था केली. परंतु राजवर्धन हंगार्गेकरने ७० धावांची खेळी साकारून महाराष्ट्राला १५० धावांचा पल्ला गाठून दिला.

प्रत्युत्तरात, हरयाणाची सुरुवातही खराब झाली. मात्र २ बाद ६ धावांवरून मयांक शंदलिया (नाबाद ८१) आणि कर्णधार निशांत सिंधू (६४) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२४ धावांची भागीदारी रचून हरयाणाचा विजय साकारला.