क्रीडा विश्वाच्या महासोहळ्याच्या रंगारंग सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी संपूर्ण जग सज्ज होत असताना ब्राझीलकरांनी मात्र असंतोषाचे हत्यार उपसले. उद्घाटन सोहळ्याआधी ब्राझिलियन जनतेच्या संतापाचा पुन्हा उद्रेक पाहायला मिळाला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा आणि रबरी गोळ्या झाडून निदर्शकांना थोपवले. ‘इथे विश्वचषक होणार नाही’ अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या. या निदर्शकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. २७ वर्षीय ग्रेगरोय लिओ या विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांने निदर्शकांची भूमिका मांडली. ‘‘विश्वचषक होऊ नये, हे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य होणार नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. मात्र ब्राझीलकरांनी अन्यायाविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे,’’ असे लिओने सांगितले.
‘हक्कांशिवाय विश्वचषक नाही’ अशी घोषणा असलेला लाल फलक घेऊन आंदोलकर्ते दाखल झाले होते. मात्र या आंदोलनकर्त्यांची संख्या कमी प्रमाणात असल्याने पोलिसांनी त्यांना अडवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
काळे शर्ट परिधान केलेल्या निदर्शकांनी ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. या निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी जाळलेला डबा त्यांच्या दिशेने फेकला. पण त्यात सीएनएन वृत्तवाहिनीचा पत्रकार, एएफपी या वृत्तसंस्थेचा प्रतिनिधी आणि एक महिला जखमी झाली. ब्राझीलच्या १२ शहरांचे प्रमुख राजकीय नेते उद्घाटन सोहळ्यासाठी साओ पावलो येथील कोरिनथिआन्स एरिना स्टेडियमवर हजर राहणार असल्यामुळे जनतेच्या मागण्यांसाठी त्यांचे लक्ष वेधण्याकरिता निदर्शने करण्यात आली. स्पर्धेच्या स्टेडियम बांधणीकरिता ११ अब्ज डॉलर खर्च करण्यात आल्यामुळे ब्राझिलियन जनता सरकारविरोधात रस्त्यावर उतरली आहे.

Story img Loader