Viral Cricket Video: मुंबईला क्रिकेटची पंढरी असं म्हटलं जातं,अनेक दिग्गज क्रिकेटपटू याच मातीत घडले. वर्षातील १२ महिने इथे क्रिकेट त्याच उत्साहात खेळलं जातं. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, पावसाळ्यात क्रिकेट कसं शक्य आहे? जून ते सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस असतो. मैदानांवर पाणी साचलेलं असतं आणि लाल मातीच्या मैदानावरही हिरव्या गवताची चादर पसरलेली असते. जोरदार पावसात, मुंबईत रबर बॉल क्रिकेटच्या अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. याच स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईत लेदर बॉल क्रिकेटसह टेनिस बॉल क्रिकेटचीही क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण पाऊस असताना टेनिस बॉलने क्रिकेट खेळणं शक्य नसतं. त्यामुळे रबर बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशीच एक स्पर्धा पाहत असताना एका आजीबाईंना फलंदाजी करत असलेल्या फलंदाजाची फलंदाजी इतकी आवडली, की त्या सामना सुरु असताना मैदानात गेल्या आणि फलंदाजाकडे सेल्फीची मागणी करु लागल्या. हा मन जिंकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावतात. यादरम्यान काही चाहते नियम मोडून थेट मैदानात प्रवेश करतात आणि आपल्या आवडत्या खेळाडूसोबत सेल्फी घेतात. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बऱ्याचदा घडलं आहे. पण स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये असं क्वचितच घडतं. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मुंबईत रबर बॉल क्रिकेटचा सामना सुरु असताना एक आजीबाई मोबाईल घेऊन मैदानात प्रवेश करतात आणि फलंदाजासोबत सेल्फी घेतात. त्यानंतर फलंदाजही पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतो. या व्हिडीओला ‘क्रिकेटवरचं प्रेम’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
आजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “आजी तू आज पूर्ण भारतातील टेनिस क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलंस.” तर आणखी एका युजरने लिहिले की, “आजी तुम्ही जे केलं,ते आजपर्यंत कुठल्याही महिलेने केलं नव्हतं, Thanks आजी.” तसेच फलंदाजी करत असलेल्या फलंदाजाने पाया पडून त्याचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे नेटकऱ्यांकडून फलंदाजावरही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
