India vs Australia: ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांच्या टी २० मालिकेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांच्या चेंडूंवर षटकार ठोकताना दिसला. सुरुवातीला संघाच्या बांधणीविषयी माहिती देताना रोहितने अर्शदीप सिंगचेही कौतुक केले. आशिया चषकात त्याने स्वतःच्या खेळात बरीच सुधारणा केली असल्याचेही रोहित म्हणाला. यावेळी एका बडबड्या पत्रकाराची आणि रोहितची गाठ पडली आणि याप्रसंगी रोहितने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

झालं असं की, एका पत्रकाराने रोहितला त्याच्या ‘टीम ९०-९५ टक्के सेटल’ या कमेंटबद्दल विचारले आणि अनुभवी झुलन गोस्वामीच्या निवृत्तीबद्दलच्या दुसर्‍या प्रश्नाशी जोडले. अनेकदा पत्रकार परिषदेत माईक कितीवेळ हातात राहील याची शाश्वती नसल्याने खूप प्रश्न सलग विचारायची या व्यक्तीला सवय असावी. या न संपणाऱ्या प्रश्नाला रोहितने आपल्या मिश्किल शैलीत उत्तर देत उलट पत्रकारालाच प्रश्न केला. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की रोहित पत्रकाराच्या प्रश्नानंतर आधी थांबला मग त्याने टोपी सरळ करत अरे यार कितने लंबे सवाल करते हो (किती लांबलचक प्रश्न करतोयस? ) असा प्रश्न केला. आणि पुढे तो हसून बोलू लागला.

पाहा रोहित शर्माचा मिश्किल अंदाज

अर्शदीपचे कौतुक करताना रोहित म्हणतो..

“अर्शदीपने बिकट परिस्थितीत ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्याची नक्कीच दखल घ्यायला हवी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पहिल्या वर्षात त्याने ज्याप्रकारे अत्यंत दडपणाखाली यॉर्कर टाकले, ते सोपं नाही. तो खुप हुशार आहे. आम्हाला डावखुऱ्या सीमरची गरज होती आणि त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीच्या फळीत लागणारे वैविध्य अर्शदीपकडे आहे.”

सहा वर्षांनंतर भारत मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामना खेळणार, या मैदानावर टीम इंडिया अद्याप हरलेली नाही

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या वेगवान जोडीचे संघात पुनरागमन होणार आहे. विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाने उत्तम कामगिरी करणे गरजेचे आहे. विशेषतः आशिया चषकातील पराभवानंतर रोहितची ब्रिगेड कसून तयारीला लागली आहे. ही मेहनत फळाला येणार का हे येत्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातच समजेल.