क्रिकेटमध्ये नेहमी नवनवे प्रकार घडत असतात. कधी एखादा गोलंदाज विचित्र पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतो, तर कधी फलंदाज मजेदार पद्धतीने फटकेबाजी करताना दिसतो. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स हा तर त्याच्या चहूबाजूंना करण्यात येणाऱ्या फटकेबाजीमुळे Mr. 360 म्हणून ओळखला जातो. तो मैदानावर खेळण्यासाठी आला की फिल्डर कुठे लावावेत हे अनेकदा कळतच नाही. तशाच पद्धतीचा एक शॉट दुसऱ्या एका फलंदाजाने मारल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

Describe this shot in one word #EnglandCricket #Blast19 #FinalsDay

A post shared by We Are England Cricket (@englandcricket) on

हा व्हिडीओ इंग्लंड क्रिकेट मंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. टी २० ब्लास्ट या इंग्लंडच्या देशांतर्गत लीग स्पर्धेतील हा व्हिडीओ आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात वोर्सेस्टरशायर विरूद्ध नॉटिंगहॅमशायर यांच्यात हा सामना सुरू होता. वोर्सेस्टरशायरने प्रथम फलंदाजी करताना ९ गड्यांच्या बदल्यात १४७ धावा केल्या होत्या. त्यामुळे नॉटिंगहॅमशायर संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी १४८ धावांचे आव्हान होते. हे आव्हान पार करताना बेन डकेटने एक अजब शॉट खेळला. गोलंदाजाने टाकलेला चेंडू त्याने अशाप्रकारे टोलवला की प्रतिस्पर्धी संघातील सारेच खेळाडू अवाक झाले.

दरम्यान, बेन डकेटने शेवटपर्यंत झुंज दिली. तो ४९ धावांवर नाबाद राहिला, पण तो सामना मात्र नॉटिंगहॅमशायर संघाला एका धावेने गमवावा लागला. सामन्यात ९ चेंडूत २१ धावा ठोकणाऱ्या आणि ४ षटकात केवळ १३ धावा देत १ बळी टिपणाऱ्या मोईन अलीला सामनावीर घोषित करण्यात आले.