‘विराट कोहली हा मला भावासारखा आहे. कारकिर्दीतील पडत्या काळात त्याने दिलेल्या सल्ल्यामुळेच मी तग धरला आणि पुनरागमन करू शकले’, असं बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने म्हटलं आहे. आरसीबी पॉडकास्ट कार्यक्रमात बोलताना सिंधूने कोहलीचं आयुष्यातलं स्थान आणि त्याने दिलेला सल्ला यासंदर्भात सविस्तर सांगितलं.
दोन ऑलिम्पिक पदकविजेती सिंधू सध्या राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळत आहे. सायना नेहवलानंतर भारतीय बॅडमिंटनची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावत ठेवण्याचं काम सिंधूने करते आहे.
‘मी कारकिर्दीत फॉर्मसाठी झगडत होते तेव्हा विराटची भेट घेतली. काहीच नीट होत नाहीये असं मी त्याला सांगितलं. त्याने प्रश्नांचा गुंता न वाढवता सल्ला दिला. सामने खेळत राहा, सराव करत राहा. तुझा नैसर्गिक जो खेळ आहे तो करत राहा’, असं विराटने सांगितलं. तू आजवर जे करत आली आहेस त्यात बदल करू नकोस. नेहमीच्याच जिद्दीने खेळत राहा असं विराट म्हणाला.
‘विराटच्या सांगण्यामुळे मी परिस्थितीकडे वेगळ्या पद्धतीने पाहू लागले. जेव्हाही मला निरुत्साह वाटायचा, खेळू नये असं वाटायचं तेव्हा त्याच्या शब्दांनी मनोधैर्य उंचवायचं. माझ्या कौशल्यावर त्याने विश्वास ठेवला’, असं सिंधू म्हणाली.
‘हरते आहेस का जिंकते आहेस हे महत्त्वाचं नाही. अथक सराव कर, नेहमीच्या त्वेषाने खेळ. तू काहीही गमावत नाहीयेस. तू काय आहेस याची तुला कल्पना आहे. जगालाही तुझ्या ताकदीची जाणीव आहे. तू तुझे सर्वोत्तम प्रयत्न देत राहा, सामना कोणताही असो. त्याच्या शब्दांनी हुरुप वाढला. माझी विचार करण्याची पद्धतच बदलली’, असं सिंधूने सांगितलं.
‘मी नियमितपणे त्याच्याशी संपर्कात असते. एखादी स्पर्धा जिंकली किंवा आनंदाचा क्षण अनुभवला तर मी त्याच्याशी शेअर करते. विराट मोठा खेळाडू आहे. प्रचंड परिश्रमातून त्याने कारकीर्द घडवली आहे. खाचखळग्यांचा सामना केला आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अतिशय कणखर आहे. त्याने भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. दडपणाच्या क्षणी कामगिरी कशी उंचवावी हे त्याने वेळोवेळी दाखवून दिलं आहे. क्रीडापटू आणि माणूस म्हणून त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत’, असं सिंधू म्हणाली.
दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने आयर्लंडच्या सोफिया नोबलवर २१-७, २१-११ असा विजय मिळवला.
