Virat Kohli Reached In Ranchi For ODI Series: दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला. आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमने-सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू रांचीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान रांचीमध्ये पोहोचताच भारताच्या माजी खेळाडूने त्याचं स्वागत केलं. हा खेळाडू नेमका आहे तरी कोण?

या मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली देखील रांचीमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान भारताचा माजी खेळाडू आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व केलेला सौरभ तिवारी विराटच्या स्वागतासाठी विमानतळावर उभा होता.

दोघेही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात एकत्र खेळायचे. त्याआधी भारताच्या १९ वर्षांखालील संघाचं देखील प्रतिनिधित्व केलं होतं. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो सध्या राजकारणात सक्रीय झाला आहे. २००८ मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती.

कोण आहे सौरभ तिवारी?

विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारतीय संघाने २००८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकून देण्यात सौरभ तिवारीचा मोलाचा वाटा होता. मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला होता. याच वर्षी याला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. २०१० मध्ये तो या संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक बनला. सध्या तो झारखंड क्रिकेट असोसिएशनचा सचिव म्हणून काम पाहतोय.

वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल आणि अर्शदीप सिंग.