Virat Kohli Century: विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये चेजमास्टर असं म्हणतात. विराटला असं का म्हटलं जातं, याचा प्रत्यत तो प्रत्येक सामन्यातून देत असतो. आव्हान कितीही मोठं असो, एकेरी, दुहेरी धावा घेऊन आणि गरज पडल्यास चौकार- षटकार खेचून तो सामना विरोधी संघापासून दूर घेऊन जातो. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने २९६ धावांचा पाठलाग करत असताना दमदार शतक झळकावलं आहे. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील ५५ वे शतक आहे. दरम्यान सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी त्याला आणखी किती शतकांची गरज आहे? जाणून घ्या.
विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये शतकांचा बादशहा आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन ४९ शतकं झळकावली होती. दरम्यान २०२३ वनडे वर्ल्डकपदरम्यान विराटने हा रेकॉर्ड मोडून काढला होता. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५ शतकं झळकावली आहेत. त्यामुळे विराट हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या रेकॉर्डमध्ये आधीपासूनच अव्वल स्थानी आहे.
आंतरराष्ट्रीय सर्वाधिक शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने ६६४ सामन्यातील ७८२ डावात १०० शतकं झळकावली आहेत. सचिन हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतकं झळकावणारा जगातील पहिलाच फलंदाज आहे. तर या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने ५६३ सामन्यातील ६३० डावात ८६ शतकं झळकावली आहेत. दरम्यान सचिनच्या १०० शतकांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यासाठी त्याला १४ शतकांची गरज आहे. तर हा विक्रम मोडून मागे टाकून पुढे जाण्यासाठी १५ शतकांची गरज आहे.
सचिनचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला
या शतकी खेळीदरम्यान विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखी एक खास रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये १५००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५००० धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ३०३ डावात १५००० धावा पूर्ण केल्या आहेत.
