Virat Kohli Hundred in Vijay Hazare Trophy: रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही विजय हजारे ट्रॉफी सामन्यात उत्कृष्ट शतक झळकावलं आहे. विराट कोहलीने वनडेमधील आपला फॉर्म कायम ठेवत दिल्ली विरूद्ध आंध्रप्रदेश सामन्यात ही शतकी खेळी साकारली. १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळण्यासाठी उतरल्यानंतर पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं आहे. १६ वर्षांनी विराट कोहलीने या स्पर्धेत शतक केलं आहे. जे लिस्ट ए मधील विराटचं ५८वं शतक आहे.
विराट कोहलीने अवघ्या ८३ चेंडूत हे वादळी शतक झळकावलं. बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये हा सामना खेळवला जात आहे. यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहलीने ३८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतरही न थांबता त्याने आपली उत्कृष्ट खेळी सुरूच ठेवली.
विराट कोहलीने विजय ट्रॉफीमध्ये अखेरचं शतक २००९ मध्ये झळकावलं होतं. हा सामना हरियाणाविरुद्ध होता आणि त्याने १२४ धावा केल्या होत्या. त्या हंगामात कोहलीने ५३४ धावा केल्या होत्या, ज्यात चार शतकांचा समावेश होता. आता विराट कोहलीने पुन्हा एकदा १६ वर्षांनी विजय हजारेमध्ये शतक केलं आहे. तो न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेच्या तयारीसाठी ही स्पर्धा खेळत आहे.
विराट कोहली पुन्हा एकदा २०१६ मध्ये जसा प्राईम फॉर्ममध्ये होता, त्याप्रमाणेच एकामागून एक शतकं झळकावत आहे. किंग कोहली सध्या वादळी फॉर्मात असून त्याने त्याच्या शेवटच्या चार एकदिवसीय डावांमध्ये तीन शतकं झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीने सलग दोन शतकं झळकावली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद ६५ धावा केल्या आणि आता त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्येही शतक झळकावलं आहे.
विराट कोहली १०१ चेंडूत १४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १३१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. विराटशिवाय नितीश राणाने देखील अर्धशतक करत त्याला चांगली साथ दिली आणि संघाच्या विजयाचा पाया रचला. विराट कोहलीने आधी प्रियांश आर्यसह ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर त्याने नितीश राणासह १२३ चेंडूत १५९ धावांची भागीदारी केली. विराटच्या या खेळीमुळे संघ विजयापासून अवघ्या काही धावा दूर आहे.
