भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली अलिकडे वेगवेगळी मंदीरं आणि आश्रमांना भेटी देत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी तो वृंदावन येथे गेला होता. त्याआधी तो आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा नैनीताल येथील एका मंदिरात गेले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ९ फेब्रुवारीपासन सुरू होणार आहे. या मालिकेआधी विराट कोहली ऋषिकेश येथे पोहोचला आहे. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुरूचा आश्रम आहे.
भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. विराट कोहलीला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. याच सुट्टीत तो ऋषिकेश येथील दयानंद गिरी यांच्या आश्रमात पोहोचला आहे. विराटसोबत त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका देखील आहे. स्वामी दयानंद गिरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील गुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट आणि अनुष्का तेथे धार्मिक अनुष्ठानासाठी गेले आहेत.
विराट कोहली येथील गंगा आरतीवेळी देखील उपस्थित होता. या आश्रमाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितलं की, विराटने येथील ब्रह्मलीन दयानंद सरस्वती यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. दोघांनी २० मिनिटं येथे ध्यान केलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विराट आज (मंगळवार) संध्याकाळपर्यंत तिथेच थांबू शकतो. विराट आणि अनुष्का तेथे भंडाऱ्याचं देखील आयोजन करणार आहेत.
हे ही वाचा >> “तुझी अडचण काय आहे…?”, भर मैदानात बटलर संतापला, दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला सुनावलं, पाहा VIDEO
कसोटीत विराटची फॉर्मशी झुंज
विराट कोहलीने एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये अलिकडच्या काळात चांगली फलंदाजी केली आहे. परंतु कसोटी क्रिकेटमध्यचे त्याची बॅट अजूनही शांत आहे. नोव्हेंबर २०१९ पासून त्याने कसोटीत एकही शतक झळकावलेलं नाही. २०२० मध्ये तीन कसोटी सामन्यांमध्ये त्याने ११६ तर २०२१ मध्ये ११ कसोटी सामन्यांमध्ये ५३६ धावा केल्या आहेत. २०२२ मध्ये विराटने ६ कसोटी सामन्यांमध्ये २६५ धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी २६ इतकी आहे. विराटची कसोटीतलं सरासरी ५४ होती जी आता ४८.९० इतकी कमी झाली आहे.