Virat Kohli – Rohit Sharma Pair Record At Lords: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेली वनडे मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत दमदार विजयाची नोंद केली होती. त्यानंतर कार्डिफच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पलटवार करत दमदार विजयाची नोंद केली. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णायक असणार आहे. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्यात अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्माकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरताच या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद होणार आहे.
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये होणारा तिसरा वनडे सामना १९ जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. त्यामुळे मालिकेतील तिसरा सामना जिंकून दोन्ही संघ मालिका जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावताना दिसून येतील. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळू शकते. विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी हा सामना अतिशय खास असणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही एकत्र ४०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत. दोघेही आतापर्यंत एकत्र ३९९ वेळा भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी ही भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी जोडी आहे. या जोडीने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा रेकॉर्ड मोडून काढला होता. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे दोघेही एकत्र ३९१ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. तर राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या नावे एकत्र ३६९ सामने खेळण्याचा रेकॉर्ड आहे. या यादीत विराट आणि रोहितची जोडी अव्वल स्थानी आहे. आता ही जोडी असा रेकॉर्ड आपल्या नावावर आहे, जो मोडणं कठीण आहे. तर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचे माजी खेळाडू कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. या जोडीने श्रीलंकेसाठी एकत्र ५५० सामने खेळले आहेत.
लॉर्ड्सच्या मैदानावर रोहित शेवटचा सामना खेळणार?
लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा शेवटचा सामना आणखी एका कारणामुळे खास ठरू शकतो. हा रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो. दुसरा वनडे सामना सुरु असतानाच रोहित शर्मा लॉर्ड्स वनडेनंतर निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. निवडकर्त्यांनी रोहितला स्पष्ट सांगितलं आहे की, तो वनडे वर्ल्डकप २०२७ च्या सेटअपचा भाग नाही. त्यामुळे रोहित शर्मा निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
