भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली काही दिवसांपू्र्वी विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना दिसून आला होता. या स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना त्याने पहिल्या सामन्यात शतक तर दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. येत्या ६ जानेवारीला तो रेल्वेविरूद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान यावेळी तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

विराटने आपल्या नवीन वर्षाची सुरूवात आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत केली आहे. विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. विराटने अनुष्कासोबत शेअर केलेल्या या फोटोला हटके कॅप्शनही दिलं आहे. त्याने लिहिले, “माझ्या आयुष्यातील प्रकाशासोबत.” (Light of my life) सोबत नव्या वर्षात पाऊल ठेवत आहे. या फोटो चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे, विराट आणि अनुष्का या दोघांनीही मास्क परिधान केला आहे. विराटने स्पायडरमॅन, तर अनुष्काने फुलपाखरूचा मास्क घातला आहे. चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

विराटची कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

विराटने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. २०२४ मध्ये टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी कसोटी क्रिकेटला रामराम केला होता. त्यामुळे तो सध्या वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कुठलाही सामना सुरू नसताना, देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक आहे. त्यामुळे विराट १० वर्षांनंतर पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या स्पर्धेतील पुनरागमनातील पहिल्याच सामन्यात त्याने १३१ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यात त्याने ७७ धावा केल्या होत्या. या दमदार खेळीसह विराटने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावा करण्याचा पल्ला देखील गाठला आहे. हा विक्रम करत असताना त्याने दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढला आहे. विराट लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद १६ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

न्यूझीलंडविरूद्धची मालिका खेळण्यासाठी उतरणार मैदानात

येत्या ११ जानेवारीपासून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. ८ जानेवारीला भारतीय संघातील खेळाडू एकत्र येणार आहेत. तर ११ जानेवारीला पहिला वनडे सामना खेळवला जाणार आहे. तर १४ जानेवारीला दुसरा सामना राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना १८ जानेवारीला इंदुरमध्ये खेळवला जाईल. ही मालिका झाल्यानंतर ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे.