Virat Kohli T20 Runs Record RCB vs SRH: भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा किंग कोहली आता आशियाचा सम्राट बनला आहे. विराट कोहलीने आयपीएल २०२६ मधील पहिल्याच सामन्यात २९ धावांचा पल्ला गाठत नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. आरसीबीने सामन्याची नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केलं. हैदराबादने संघाला २०२ धावांचं लक्ष्य दिलं, पण देवदत्त पडिक्कल आणि विराटने वादळी फटकेबाजी केली आणि यादरम्यानच विराटने नव्या विक्रमाला गवसणी घातली.

सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करत आरसीबीला विजयासाठी २०२ धावांचं लक्ष्य दिलं. फिल सॉल्ट चांगल्या सुरूवातीनंतर पुन्हा माघारी परतला. यानंतर देवदत्त पडिक्कलने आपला वादळी फॉर्म कायम ठेवला आणि विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी रचली. देवदत्त पडिक्कल २६ चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावा करत बाद झाला. तर विराट कोहलीने २९ धावा करताच आशियाचा सम्राट होण्याचा मान पटकावला.

विराट कोहलीचा टी-२० विक्रम

विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियातील पहिला फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानच्या शोएब मलिकला मागे टाकत त्याने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. आरसीबीच्या सामन्यापूर्वी विराटने या फॉरमॅटमध्ये ४१४ सामन्यांमध्ये आता १३५४३ धावा केल्या होत्या. तर शोएब मलिकाच्या नावे १३५७१ धावांची नोंद होती. आता विराटने २९ धावा करताच शोएब मलिकला मागे टाकलं आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये आशियात सर्वाधिक धावांचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब मलिकच्या नावावर होता. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५५७ सामन्यांमध्ये १३ हजार ५७१ धावा केल्या आहेत. तर आता विराटने त्याच्यापेक्षा धावा करत आशियातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे. विराट कोहलीच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये १०६ अर्धशतकं आणि ९ शतकं करण्याचा विक्रम आहे. विराटने आरसीबी वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात ३३ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं.

विराट कोहलीच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीच्या बळावर आरसीबीने २०२ धावांचं लक्ष्य अवघ्या १५.४ षटकांत गाठलं. विराटने हर्षल पटेलच्या १६व्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आणि पुढील ३ चेंडूंवर चौकार लगावत संघाचा विजय निश्चित केला. विराटने या सामन्यात ३८ चेंडूत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावांची खेळी केली.