Virat Kohli Bhuvneshwar Kumar Dance Video: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलचं सलग दुसरं जेतेपद आपल्या नावे केलं. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरातचा पराभव करत आयपीएल ट्रॉफी आपल्या नावे केली. १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आता आरसीबीने सलग दोन आयपीएलची जेतेपदं आपल्या नावे केली आहेत. आरसीबीच्या या विजयानंतर संघाने टीम हॉटेलमध्ये डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घातला. विराट कोहली आरसीबीने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये मनसोक्त डान्स करताना दिसला होता. यादरम्यान आता स्वत: विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारबरोबर डान्स करतानाचा व्हीडिओ शेअर केला आहे.

आरसीबीच्या सलग दुसऱ्या जेतेपदाच्या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली. सलामीला उतरलेल्या विराट कोहलीने या सामन्यात मॅचविनिंग खेळी केली. एका टोकाकडून संघाच्या विकेट्स पडत असताना विराट दुसऱ्या टोकाला मात्र पाय घट्ट रोवून उभा होता. विराटने या सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. संघाला विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने विजयी षटकार लगावत आरसीबीच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केला. तर भुवनेश्वर कुमारने संपूर्ण स्पर्धेत आरसीबीसाठी मॅचविनिंग कामगिरी केली. भुवनेश्वर कुमार हा आरसीबीचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला, तर पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने स्पर्धेत २८ विकेट्स घेतल्या.

विराट-भुवीचा किकली स्पेशल डान्स पाहिलात का?

सलग दुसरं जेतेपद जिंकल्यानंतर आरसीबीचा संपूर्ण संघ विजयाच्या आनंदात मग्न होता. मैदानावरील जल्लोषानंतर टीम हॉटेलमध्ये जाण्यापूर्वीच डान्स करायला सुरूवात झाली होती. टीम हॉटेलमध्ये ढोलांच्या गजरात संघाचं स्वागत झालं. कृणाल पंड्या ट्रॉफी घेऊन डान्स करत होता, तर विराट कोहली त्याला साथ दिली. यानंतर टीम हॉटेलमध्ये चॅम्पियन लिहिलेली जर्सी परिधान करत संघाने विजयाचा आनंद साजरा केला. विराट कोहलीने पत्नी अनुष्कासह व सर्व आरसीबीच्या संघासह डान्स करतानाचा व्हीडिओही आरसीबीच्या पेजवर पाहायला मिळाला.

Virat Kohli Bhuvneshwar Kumar Dance video

आता विराट कोहलीने भुवनेश्वर कुमारबरोबर डान्स करतानाचा व्हीडिओ आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. यादरम्यान दोघे डान्स करत असताना विराट अचानक भुवनेश्वरसोबत फुगडी घालताना दिसला. त्यानंतर भांगडा करताना जसं दोन जण पायात पाय गुंतवून डान्स करतात तसंही केलं. या व्हीडिओला विराटने ‘Kikli Boys’ असं कॅप्शन दिलं आहे. किकली हा पंजाबचा लोकनृत्य प्रकार आहे. अगदी फुगडीप्रमाणेच हा प्रकार आहे, जे विराट व भुवी या व्हीडिओमध्ये नाचताना दिसत आहेत. विराटने शेअर केलेला हा व्हीडिओ लगेचच व्हायरल झाला आहे.