Virat Kohli 38th Birthday Family Special Story: क्रिकेट इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरांनी उमटवणारा भारताचा लाडका फलंदाज विराट कोहलीचा आज ३८वा वाढदिवस. दिल्लीच्या पश्चिम विहार भागात ५ नोव्हेंबर १९८८ रोजी जन्मलेल्या या मुलाने आपल्या कौशल्याने क्रिकेट जगतावर राज्य करत आहे. अनेक विविध विश्वविक्रम, धावांचा पाऊस आणि करोडो चाहत्यांचा लाडका किंग कोहली बनला आहे. या सर्वांच्या लाडक्या विराटच्या कुटुंबात पत्नी अनुष्का शर्मासह अजून कोणकोण आहे जाणून घेऊया.
विराटच्या आजवरच्या यशस्वी प्रवासामागे त्याच्या कुटुंबाचाही मोठा वाटा आहे. वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी वडील प्रेम कोहली यांनी त्याला क्रिकेट अकादमीत दाखल केलं. त्याच्या सरावापासून ते सामन्यांपर्यंत वडील कायम सोबत असायचे. मात्र, २००६ मध्ये वयाच्या १८व्या वर्षी विराटच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी दिल्लीकडून रणजी सामना खेळणाऱ्या विराटने वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच दिवशी मैदानावर उतरून ९० धावांची खेळी केली. आई सरोज कोहली, मोठा भाऊ विकास आणि बहीण भावना यांनीही प्रत्येक कठीण प्रसंगी त्याला साथ दिली. तर पत्नी अनुष्का शर्माने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
विराटनेही अनेकदा आपल्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा आणि त्यांच्याकडून मिळणारी मानसिक ताकद महत्त्वाची असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे विराटचा हा प्रवास केवळ एका क्रिकेटपटूच्या विक्रमांचा नसून, कुटुंबाच्या पाठिंब्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका मुलाची प्रेरणादायी कहाणी आहे. विराटच्या कुटुंबात कोण-कोण आहे आणि ते काय करतात, जाणून घेऊया.

सरोज कोहली (आई)
विराट कोहलीच्या आईचं नाव सरोज कोहली आहे. विराट कोहलीचे वडील प्रेम कोहली हे क्रिमिनल वकील होते. वडिलांच्या मृत्यूनंतर विराटच्या आईने त्याला सातत्याने पाठिंबा दिला, त्यांच्या कुटुंबाचा आधारस्तंभ त्याची आई आहे. विराट कोहलीला एक भाऊ व बहिण आहे. या तिघांमध्ये तो सर्वात लहान आहे.

विकास कोहली (भाऊ)
विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहली हा व्यावसायिक आहे. तो प्रसिद्धीपासून शक्यतो दूर राहतो. विकास हा विराटपेक्षा मोठा असून, गुरुग्राममध्ये त्याचा व्यवसाय आहे. विराटच्या क्रिकेट कारकिर्दीला आकार देण्यात विकासने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विराट कोहलीच्या व्यावसायिक व्यवहारांची बहुतांश जबाबदारी त्याचा मोठा भाऊ विकास कोहली सांभाळतो.
दोन्ही भावांमध्ये अतिशय घट्ट नातं आहे. विशेषतः विराटच्या ‘One8’ या ब्रँडशी संबंधित व्यवसायांमध्ये त्याचा सहभाग आहे. One8 Commune या रेस्टॉरंट आणि बार चेनच्या व्यवस्थापनातही विकासची महत्त्वाची भूमिका आहे. याशिवाय, तो विराटसोबत ‘One8 Select’ या रिटेल व्यवसायाशीही जोडलेला आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये विराटने गुरुग्राममधील डीएलएफ सिटी फेज-१ परिसरातील जवळपास ८० कोटी रुपये किमतीच्या आलिशान बंगल्याची जनरल पॉवर ऑफ अटर्नी (GPA) आपल्या मोठ्या भावाच्या नावावर केली होती. विकासचे लग्न चेतना कोहली यांच्याशी झाले असून त्यांना आर्यवीर नावाचा मुलगा आहे. आर्यवीरदेखील क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

भावना धिंग्रा (मोठी बहिण)
विराट कोहलीची मोठी बहीण भावना कोहली धिंग्रा हीदेखील व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असून ती उद्योजिका आहे. दिल्लीमध्ये लहानाची मोठी झालेल्या भावनाने हंसराज मॉडेल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं, तर दिल्लीच्या दौलत राम महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. २००२ मध्ये तिचा विवाह व्यावसायिक संजय धिंग्रा यांच्याशी झाला. या दाम्पत्याला आयुष आणि मेहक अशी दोन मुलं आहेत. भावना स्वतःचा ‘Abane House of Artistry’ हा होम डेकोर आणि लाइफस्टाइलशी संबंधित व्यवसाय सांभाळते. याशिवाय, विराटच्या ‘One8 Select’ आणि ‘Wrogn’ या फॅशन ब्रँडच्या व्यावसायिक कामकाजातही तिचा सहभाग असल्याचं वृत्त आहे. विराटच्या क्रिकेट प्रवासातही भावनाने त्याला नेहमीच प्रोत्साहन दिलं.

आर्यवीर कोहली (भाचा)
विराट कोहलीचा भाचा आर्यवीर कोहली हा त्याचा मोठा भाऊ विकास कोहली यांचा मुलगा असून, तो काकाप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानावर आपली ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. आर्यवीरला फलंदाजीऐवजी गोलंदाजीची आवड असून तो डावखुरा लेगस्पिनर आहे. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी त्याची दिल्ली प्रीमियर लीगमध्ये निवड झाली होती. २०२५ मध्ये झालेल्या या स्पर्धेच्या लिलावात साऊथ दिल्ली सुपरस्टार्ज संघाने त्याला १ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले. विशेष म्हणजे, आर्यवीरने विराटप्रमाणेच वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमीतून क्रिकेटचे धडे गिरवले असून, त्याला विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचंही मार्गदर्शन मिळालं आहे.

अनुष्का शर्मा (पत्नी)
विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा हीदेखील त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे. विराट आणि अनुष्काची पहिली भेट २०१३ मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. २०२१ मध्ये त्यांच्या घरी मुलगी वामिकाचा जन्म झाला, तर २०२४ मध्ये मुलगा अकायचे आई-बाबा झाले. विराटच्या क्रिकेट कारकिर्दीतील चढ-उतारांच्या काळात अनुष्का अनेकदा त्याच्या पाठीशी उभी राहिली आहे. सध्या दोघेही मुलांच्या संगोपनाला आणि कौटुंबिक आयुष्याला प्राधान्य देत आहेत.
