Virat Kohli personal bodyguard misbehaves with media in Cardiff: भारताच्या इंग्लंड दौऱ्यात विराट कोहली पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कोहली वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असून, तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी संघ कार्डिफमध्ये दाखल झाला आहे. दुसरा वनडे सामना १६ जुलैला होणार आहे. यादरम्यान कोहलीचा वैयक्तिक बॉडीगार्ड या मालिकेत त्याच्यासोबत असल्याचं व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत आहे. पण या बॉडीगार्डने इंग्लंडमध्ये पत्रकारांशी व चाहत्यांशी गैरवर्तन केल्याचा ओराप झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
कार्डीफमध्ये पुढील वनडे सामन्यासाठी भारतीय संघ दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. इंग्लंडमध्ये वनडे मालिका कव्हर करण्यासाठी गेलेल्या अनेक पत्रकारांनी हा संपूर्ण प्रकार घडल्याचं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं आहे. यानंतर आता विराट कोहलीचा बॉडीगार्ड चर्चेचा विषय ठरला आहे.
विराट कोहलीच्या बॉडीगार्डवर पत्रकारांचे मोठे आरोप
रेव्हस्पोर्ट्झचे पत्रकार शुभायन चक्रवर्ती आणि जागरण न्यूजचे पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी यासंबंधित पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यांच्या दाव्यानुसार भारतीय संघ बसकडे जात असताना मान्यताप्राप्त पत्रकार नियोजित मीडिया झोनमध्ये उभे राहून संघ टीम बसकडे जात चित्रीकरण करत होते. त्यांच्याकडे अधिकृत मान्यतापत्र (Accreditation Cards) देखील होते. विराट कोहली संघाच्या बसमध्ये चढल्यानंतर हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रकारांनी आरोप केला आहे की, विराट कोहलीचा वैयक्तिक बॉडीगार्ड एका पत्रकाराजवळ आला आणि त्याला वारंवार अश्लील शिवीगाळ करत त्याला तिथून निघून निघून जाण्यास सांगितलं. संबंधित पत्रकाराने आपण मान्यताप्राप्त (Accredited) पत्रकार असल्याचं सांगत अधिकृत मान्यतापत्रही दाखवलं. तरीही, बॉडीगार्डने शिवीगाळ सुरूच ठेवली, असा आरोप करण्यात आला आहे. पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी दावा केला की, यापूर्वीही कोहलीच्या बॉडीगार्डने माध्यम प्रतिनिधींशी गैरवर्तन केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, या गोंधळादरम्यान एका चाहत्याचा मोबाईल फोनही बॉडीगार्डमुळे खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला की, संबंधित बॉडीगार्डची नियुक्ती बीसीसीआयने केली होती की तो विराट कोहलीचा खासगी बॉडीगार्ड होता? जर तो बीसीसीआयच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग असेल, तर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. तसेच, एखाद्या खेळाडूला वैयक्तिक बॉडीगार्ड ठेवण्याची परवानगी कशी देण्यात आली, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या आरोपांवर विराट कोहली किंवा बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे, भारतीय संघातील इतर कोणत्याही खेळाडूसोबत बॉडीगार्ड दिसला नाही. उलट, रोहित शर्मा आणि इशान किशन यांसारखे खेळाडू चाहत्यांना मुक्तपणे ऑटोग्राफ देताना दिसले.
