Virat Kohli Overtakes Mohammad Azharuddin Most ODIs Against West Indies: भारताचे रो-को म्हणजेच रोहित शर्मा व विराट कोहली वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात खेळण्यासाठी मैदानावर उतरले आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेला आज म्हणजेच २७ सप्टेंबरपासून सुरूवात झाली आहे. या पहिल्या सामन्यात मैदानात उतरताच किंग कोहलीने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहलीने इतिहास घडवला. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा भारतीय खेळाडू ठरत त्याने माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा २८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. विराट वेस्ट इंडिजविरुद्धचा आपला ४ वा एकदिवसीय सामना खेळत आहे, तर ४३ सामन्यांसह अझरुद्दीन आता दुसऱ्या स्थानावर आले आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आणि अझरुद्दीन यांच्यानंतर कपिल देव (४२), राहुल द्रविड (४०) आणि महेंद्रसिंग धोनी (३९) यांचा क्रमांक लागतो. अझरुद्दीनने वेस्ट इंडिजविरुद्धचा आपला शेवटचा एकदिवसीय सामना ऑक्टोबर १९९८ मध्ये खेळला होता.

वेस्ट इंडिजविरूद्ध सर्वाधिक वनडे सामने खेळणारे भारतीय खेळाडू

विराट कोहली – ४४ सामने
मोहम्मद अझरूद्दीन – ४३ सामने
कपिल देव – ४२ सामने
राहुल द्रविड – ४० सामने
एम एस धोनी – ३९ सामने
सचिन तेंडुलकर – ३९ सामने

वेस्ट इंडिजविरुद्धच्या या वनडे मालिकेत विराट कोहलीला शिवनारायण चंद्रपॉलचा विक्रम बरोबरीत आणण्याची संधी आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यांमध्ये सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम चंद्रपॉलच्या नावावर आहे; त्याने १९९४ ते २००९ या काळात असे ४६ सामने खेळले होते. त्यामुळे, जर विराट कोहली या मालिकेतील तिन्ही वनडे सामने खेळला, तर तो चंद्रपॉलच्या विक्रमाशी बरोबरी करेल.

वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय सामने (ODIs) खेळण्याचा विक्रम पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद आणि वसीम अक्रम यांच्या नावावर आहे. अक्रम आणि मियांदाद या दोघांनीही कॅरिबियन संघाविरुद्ध प्रत्येकी ६४ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा सहभाग

शिवनारायण चंद्रपॉल – ४६ सामने
कार्ल हुपर – ४५ सामने
मार्लोन सॅम्युल्स – ४४ सामने
विराट कोहली – ४४ सामने
मोहम्मद अझरूद्दीन – ४३ सामने
कपिल देव – ४२ सामने
ब्रायन लारा – ४२ सामने