यंदाच्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहलीनं टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी विराट कोहलीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये आपण एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधार म्हणून खेळत राहू, असे देखील संकेत दिले होते. मात्र, दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० सोबतच एकदिवसीय संघाचं कर्णधारपद देखील रोहीत शर्माकडेच असेल, असं एका ओळीत जाहीर केल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू झाली. यासंदर्भात आता खुद्द विराट कोहलीनंच खुलासा केला असून नेमकं निवड समितीच्या त्या बैठकीत काय घडलं, याविषयी मौन सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्यामध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा क्रीडा वर्तुळात सुरू आहे. याच वादाचा फटका विराट कोहलीच्या कर्णधारपदाला बसल्याचं देखील बोललं जात आहे. एकीकडे विराट कोहलीनं असा कोणताही वाद नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं असताना दुसरीकडे या वादामुळेच रोहीत शर्मानं कसोटी मालिकेमधून माघार घेतल्याचा देखील तर्क लावला जात आहे. विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेण्याचा निर्णय ज्या बैठकीत झाला, त्या बैठकीचा वृत्तांत विराटनं सांगितला आहे.

फोन कॉलवर कसोटी संघावर चर्चा झाली आणि…

“एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाविषयी माझं बीसीसीआयशी काहीच बोलणं झालेलं नव्हतं. मला फक्त विश्रांती हवी होती. निवड समितीच्या बैठकीच्या दीड तास आधी मला संपर्क करण्यात आला. त्याआधी यावर काहीही चर्चा झालेली नव्हती. त्यावेळी निवड समितीच्या प्रमुखांनी माझ्यासोबत कसोटी संघाविषयी चर्चा केली. आणि तो फोन कॉल संपवताना निवड समितीच्या पाचही सदस्यांनी मला सांगितलं की तू आता एकदिवसीय संघाचा कर्णधार नसशील. हे ठीक आहे”, असं विराट कोहीलीनं आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

मी प्रामाणिकपणे कर्णधारपद सांभाळलं!

“कर्णधारपदाविषयी म्हणाल, तर मी प्रामाणिकपणे कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाविषयी माझा हा निष्कर्ष आहे. इथे तुम्हाला माहिती असतं की चांगली कामगिरी कशी करायची आहे. तुम्हाला फक्त तुमची जबाबदारी समजून घेऊन तुमच्या क्षमतांनुसार कामगिरी करायची असते”, असं देखील विराट कोहलीनं यावेळी नमूद केलं.

“अफवांवर विश्वास ठेवू नका, मी एकदिवसीय मालिका…”, विराट कोहलीनं दिलं स्पष्टीकरण!

टी-२०चं कर्णधारपद सोडताना मी BCCI ला सांगितलं होतं की…

दरम्यान, यावेळी विराट कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडताना बीसीसीआयसोबत काय चर्चा झाली होती, याविषयी देखील सांगितलं. “टी-२०चं कर्णधारपद सोडण्यापूर्वी मी बीसीसीआयला कल्पना दिली होती. त्यांना मी माझी भूमिका सांगितली. त्यांनीही ती चांगल्या प्रकारे समजून घेतली. तिथे कुठेही वाद नव्हता. हा चांगला निर्णय असल्याचं मला सांगितलं गेलं. मी त्यांना सांगितलं होतं की मी एकदिवसीय आणि कसोटी संघाचं कर्णधारपद सांभाळेन. मी तेव्हाही त्यांना म्हटलं होतं की तर निवड समितीला वाटलं की ही जबाबदारी मी सांभाळू शकत नाही, तर त्यालाही माझी हरकत नाही. माझ्या टी-२० कर्णधारपदाविषयी बीसीसीआयला सांगताना हे सर्व मी सांगितलं होतं”, असं विराट कोहली यावेळी म्हणाला.

“मी आता थकलो आहे, गेल्या अडीच वर्षापासून…”; रोहित शर्मासोबतच्या कर्णधारपदाच्या वादावर विराटने सोडले मौन

आता विराट कोहलीच्या या नव्या खुलाशांनंतर यावरून नवी चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli breaks silence on t20 captaincy communication with bcci pmw
First published on: 15-12-2021 at 15:15 IST