Virat Kohli Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ११ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. पहिल्या सामन्यात विराटने दमदार अर्धशतकी खेळी केली होती. चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही त्याला चांगली सुरुवात मिळाली होती. पण तो १८ चेंडूत २८ धावा करून माघारी परतला. लवकर बाद होऊनही विराटने रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
या यादीत पोहोचला नंबर १ स्थानी
विराट कोहली पहिल्या हंगामापासून या स्पर्धेचा भाग आहे. त्याने या स्पर्धेतील सर्व संघांविरुद्ध खेळताना धावांचा पाऊस पाडला आहे. आता आयपीएल स्पर्धेतील एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात विराटने रोहित शर्माला मागे टाकलं आहे.
याआधी हा रेकॉर्ड विराट कोहलीच्याच नावे होता. पण रोहितने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून हा रेकॉर्ड मोडला होता. आता पुन्हा एकदा विराट अव्वल स्थानी पोहोचला आहे. विराटने चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध खेळताना ११८८ धावा केल्या आहेत. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहितच्या नावे ११६१ धावा करण्याची नोंद आहे. रोहितने हा कारनामा कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात केला आहे.
आयपीएल स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – ११८८ धावा विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
रोहित शर्मा – ११६१ धावा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
विराट कोहली – ११५९ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज
डेव्हिड वॉर्नर – ११३४ धावा विरुद्ध पंजाब किंग्ज
विराट कोहली – ११३० विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स</p>
डेव्हिड वॉर्नर -१०९३ धावा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने उभारला २५० धावांचा डोंगर
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून फिल सॉल्टने ४६ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने २८ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने ५० धावा केल्या. रजत पाटीदारने नाबाद ४८ धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने नाबाद ७० धावांची खेळी केली.
