Virat Kohli Celebration: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. रायपूरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात आधी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सामना उशिराने सुरु झाला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकांअखेर १९२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी चांगली सुरुवात करुन दिली. दरम्यान १ धाव घेताच विराटने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विराट कोहलीने आयपीएल २०२६ स्पर्धेत दमदार सुरुवात केली होती. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर होता. पण गेल्या २ सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याला प्रिन्स यादवने शून्यावर बाद करून माघारी धाडलं होतं. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात दीपक चाहरने त्याला शून्यावर बाद करत माघारी धाडलं होतं. त्यामुळे या सामन्यात जर तो शून्यावर बाद झाला असता, तर शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक झाली असती. त्यामुळे त्याने १ धाव घेऊन आधी शून्यावर बाद होण्याची मालिका थांबवली.
या सामन्यात १९३ धावांचा पाठलाग करताना, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराट कोहली आणि जेकब बेथलची जोडी मैदानावर आली. तर कोलकाता नाईट रायडर्सकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजीला आलेला सौरभ दुबे गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याच्या पहिल्याच षटकात विराटने मिड विकेटच्या दिशेने हलक्या हाताने चेंडू ढकलला आणि वेगाने धावून १ धाव पूर्ण केली. १ धाव पूर्ण करताच विराटने येस्स्स्स.. असा इशारा करून जोरदार सेलिब्रेशन केलं. कारण लागोपाठ २ वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर विराट जर लागोपाठ तिसऱ्यांदा शून्यावर बाद झाला असता, तर त्याच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद झाली असती. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
कोलकाता नाईट रायडर्सने केल्या १९२ धावा
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य रहाणे १९, फिन अॅलेन १८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक ७१ धावांची खेळी केली. तर कॅमेरुन ग्रीनने ३२ धावांचे योगदान दिले. तर शेवटी रिंकू सिंग ४९ धावांवर नाबाद राहिला.
