Virat Kohli Record: आयपीएल २०२६ स्पर्धेत विराट कोहलीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आले.गेल्या २ सामन्यातील कामगिरी वगळली, तर आतापर्यंत त्याने दमदार कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात विराट शून्यावर बाद झाला होता. पण कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

विराट कोहलीला चेजमास्टर बोलतात, त्याला चेजमास्टर का म्हटलं जातं हे त्याने अनेकदा सिद्ध केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यातही त्याने दमदार शतकी खेळी केली. यादरम्यान त्याने आयपीएल २०२६ स्पर्धेत ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. यासह आयपीएल स्पर्धेतील १९ हंगामात त्याने १२ वेळेस ४०० धावांचा पल्ला गाठला आहे. आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीची आयपीएलच्या १९ हंगामातील कामगिरी…

२००८ – १६५ धावा
२००९ – २४६ धावा
२०१० – ३०७ धावा
२०११ – ५५७ धावा
२०१२ – ३६४ धावा
२०१३ – ६३४ धावा
२०१४ – ३५९ धावा
२०१५ – ५०५ धावा
२०१६ – ९७३ धावा (विक्रम)
२०१७ – ३०८ धावा
२०१८ – ५३० धावा
२०१९ – ४६४ धावा
२०२० – ४६६ धावा
२०२१ – ४०५ धावा
२०२२ – ३४१ धावा
२०२३ – ६३९ धावा
२०२४ – ७४१ धावा
२०२५ – ६३४ धावा
२०२६ – ४०० धावा (चालू हंगाम)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दमदार विजय

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने ४ गडी बाद १९२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून जेकब बेथेल अवघ्या १५ धावा करून माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलने ३९ धावांची खेळी केली. कर्णधार रजत पाटीदार अवघ्या ११ धावा करून माघारी परतला. तर टिम डेव्हिडने २ धावांचे योगदान दिले. त्यानंतर शेवटी विराट कोहली १०५ धावांवर नाबाद राहिला.तर जितेश शर्मा ८ धावांवर नाबाद राहिला. विराटच्या या स्पर्धेच्या इतिहासातील ९ व्या शतकी खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने जवळजवळ प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.