Virat Kohli golden duck vs West Indies 3rd ODI Mullanpur: विराट कोहलीला ७ वर्षांनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नकोसा दिवस पाहायला मिळाला आहे. वेस्ट इंडिजविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली गोल्डन डकवर क्लीन बोल्ड होत माघारी परतला. पहिल्या सामन्यात विक्रमांची रांग लावलेला विराट कोहली या सामन्यात मात्र पहिल्याच चेंडूवर माधारी परतला. त्याच्या या विकेटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहली यापूर्वी जेव्हा ‘गोल्डन डक’वर (पहिल्याच चेंडूवर) बाद झाला होता, तेव्हाही प्रतिस्पर्धी संघ वेस्ट इंडिजचा संघच होता. १८ डिसेंबर २०१९ ला विशाखापट्टणम येथील डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात, विराट खातं न उघडताच पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. आताही वेस्ट इंडिजसमोरच विराटला हा दिवस पाहावा लागला आहे.

मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर भारताला दोन मोठे धक्के बसले; आधी कर्णधार शुबमन गिल झेलबाद झाला आणि त्यानंतर अवघ्या एका चेंडूच्या अंतराने स्टार खेळाडू विराट कोहलीही बाद झाला.

जेडन सील्सने ताशी १३६.५ किमी वेगाने एक ‘फुल लेन्थ’ चेंडू टाकला, जो आतल्या दिशेने थोडा वळला. कोहलीने चेंडू ‘फ्लिक’ करण्याच्या उद्देशाने पुढे पाऊल टाकलं, पण त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये इतकी मोठी फट निर्माण झाली की सील्सचा चेंडू थेट जाऊन स्टंप्सवर आदळला. यामुळे विराट कोहलीचा मधला स्टंप उखडून पडला. विराट त्रिफळाचीत झाल्याचं पाहता स्टेडियममध्ये भयाण शांतता पसरली. तर विकेट पाहून स्वत: विराट कोहली आश्चर्यचकित होत गोलंदाजाकडे पाहता राहिला. विराटच्या विकेटचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल होत आहे.

विराट कोहली पुन्हा एखादी मोठा खेळी साकारेल, अशी आशा बाळगणाऱ्या प्रत्येकानेच निराशाजनक भावनेने आपली मान खाली घातली. कोहली ‘गोल्डन डक’वर (पहिल्याच चेंडूवर) बाद झाला होता. अवघ्या एका सामन्यापूर्वीच इतिहास घडवणाऱ्या आणि मालिकेची सुरुवात शतकाने करणाऱ्या कोहलीला मात्र मालिकेचा शेवट शून्य धावेवर करावा लागला.

शुबमन गिल व विराट कोहली स्वस्तात बाद झाल्याने भारताला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर रोहित शर्मा व ऋतुराज गायकवाड यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनीही सावध आणि संथपणे खेळपट्टीवर वेळ काढत हळूहळू आपली खेळी साकारत भारताचा डाव सावरला. दोघांनी आतापर्यंत शतकी भागीदारी साकारल्याने भारताने १०० धावांचा पल्ला पार केला आहे.