विराट कोहली आणि रांचीचं झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन स्टेडियम यांचा ऋणानुबंध खास असा. प्रदीर्घ अशा वनडे कारकिर्दीत विराट या मैदानावर जेव्हाही खेळला आहे तेव्हा त्याची बॅट तळपली आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना विराटने ५२वं शतक झळकावलं. या मैदानावरचं त्याचं हे तिसरं शतक आहे.

विराट पहिल्यांदा या मैदानावर २०१३ साली खेळला. इंग्लंडविरुद्धच्या या लढतीत विराटने नाबाद ७७ धावांची खेळी केली. इंग्लंडचा डाव १५५ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीय संघाने विराटच्या अर्धशतकाच्या बळावर विजय मिळवला. विराटलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पावसामुळे सामना रद्द झाला. विराटला फलंदाजीच करावी लागली नाही.

पुढच्याच वर्षी या मैदानावर खेळताना विराटने नाबाद १३९ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. श्रीलंकेने अँजेलो मॅथ्यूजच्या शतकाच्या बळावर २८६ धावांची मजल मारली होती. विराटने चेस मास्टर असल्याचं सिद्ध करत दमदार खेळी साकारली. १२ चौकार आणि ३ षटकारांसह विराटने ही खेळी सजवली होती. विराटच्या शतकाच्या बळावरच भारतीय संघाने ३ विकेट्सने विजय मिळवला.

२०१६ मध्ये विराटने या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळताना ४५ धावांची खेळी केली होती. विराटला मोठी खेळी करता आली नाही. भारतीय संघाने हा सामना गमावला.

२०१९ मध्ये विराटने या मैदानावर खणखणीत शतक साकारलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३१३ धावा केल्या. उस्मान ख्वाजाने शतक झळकावलं. आरोन फिंचने ९३ धावा करत त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाचा डाव २८१ धावांतच संपुष्टात आला. विराटच्या १२३ धावांचा अपवाद वगळता बाकी कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.

सहा वर्षानंतर या मैदानावर पुनरागमन करताना विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलं. विराटने रोहित शर्माबरोबर दुसऱ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी साकारली. रोहित बाद झाल्यानंतर विराटने सूत्रं हाती घेतली. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही विराटची लय बिघडली नाही. विराटने १२० चेंडूत १३५ धावांची दिमाखदार खेळी साकारली. २०२७ वर्ल्डकपच्या दृष्टिकोनातून या मालिका महत्त्वाच्या आहेत.फिटनेस आणि कामगिरी दोन्ही मुद्यांवर फिट असल्याचं विराटने या खेळीसह सिद्ध केलं.