Virat Kohli Record: विजय हजारे ट्रॉफी २०२५ स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे दिग्गज खेळाडू मैदानात उतरले आहेत. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात दोघांनी दमदार शतकं झळकावली. मात्र, दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माला हवी तशी सुरुवात करून देता आली नाही. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विराट कोहलीने दमदार शतकी खेळी केली होती. विराट कोहलीने या सामन्यातही दमदार अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीसह त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

दिल्लीचा दुसरा सामना गुजरातविरुद्ध पार पडला. बंगळुरूतील सेंटर ऑफ एक्सेलेंसच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ६१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. या तुफानी खेळीदरम्यान त्याने १३ चौकार आणि १ षटकार मारला

दिल्लीकडून डावाची सुरूवात करण्यासाठी प्रियांश आर्य आणि अर्पित राणा ही जोडी मैदानावर आली होती. पण या जोडीला हवी तशी सुरुवात करून देता आली नाही. दिल्लीकडून विराट तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला.

विराटच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद

या दमदार अर्धशतकी खेळीसह विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. या अर्धशतकी खेळीसह त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरी नोंदवली आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये ५७.८७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. या मोठ्या विक्रमात त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल बेवनचा विक्रम मोडून काढला आहे. मायकल बेवनने ५७.८६ च्या सरासरीने धावा केल्या होत्या.

लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे फलंदाज

विराट कोहली, भारत – ५७.८७
मायकल बेवन, ऑस्ट्रेलियाला – ५७.८६
सॅम हेन, इंग्लंड – ५७.७६
चेतेश्वर पुजारा, भारत – ५७.०१
ऋतुराज गायकवाड, भारत – ५६.६८