Virat Kohli Completed 9000 Runs In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ३९ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना दिल्लीच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला होता. पहिल्या डावात दिल्लीचा संपूर्ण डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहलीने ११ धावा पूर्ण करताच आयपीएलमध्ये मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आधीपासून अव्वल स्थानी आहे. आता त्याच्या नावे आणखी एक मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. विराट कोहली हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ९००० धावांचा पल्ला गाठणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटने हा कारनामा २७६ व्या सामन्यात आपल्या नावावर केला आहे. याआधी कुठल्याही फलंदाजाला ९००० धावांचा पल्ला गाठता आलेला नाही. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहितने २७६ सामन्यांमध्ये ७१८३ धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या शिखर धवनने ६७६९ धावा केल्या आहेत. तर चौथ्या स्थानी असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ६५६५ धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानी असलेल्या केएल राहुलच्या नावे ५५८० धावा करण्याची नोंद आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

विराट कोहली – ९००० धावा (२७५ सामने)

रोहित शर्मा – ७१८३ धावा (२७६ सामने)

शिखर धवन – ६७६९ धावा (२२२ सामने)

डेव्हिड वॉर्नर – ६५६५ धावा (१८४ धावा)

केएल राहुल – ५५८० धावा (१५३ सामने)

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव अवघ्या ७५ धावांवर आटोपला. दिल्लीकडून अभिषेक पॉरेलने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तर इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ९ गडी राखून दमदार विजयाची नोंद केली.