Virat Kohli Creates Histroy in IPL: आयपीएल इतिहासात विराट कोहली हा एकाच फ्रँचायझीकडून पूर्ण १९ वर्षे खेळणारा एकमेव खेळाडू आहे. या दुर्मिळ विक्रमासह विराटने अजून एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात किंग कोहलीने ८१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराटने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आणि एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो याआधी आयपीएलमध्ये कोणत्याच खेळाडूला करता आलेला नाही.

गुजरातने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट जेबक बेथलसह फलंदाजीला उतरला. पण बेथल लवकर बाद झाला. यानंतर विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटासाठी ११५ धावांची भागीदारी रचली. पडिक्कल झटपट ५५ धावा करत बाद झाला. तर विराट कोहली ८१ धावांवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्लीन बोल्ड झाला. त्यामुळे विराटचं शतक हुकलं.

विराट कोहलीचं शतक हुकलं असलं तरी त्याने या खेळीदरम्यान मोठा विक्रम केला. विराट आयपीएलच्या इतिहासात ८०० चौकार मारणारा पहिला खेळाडू ठरला. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम आता विराटच्या नावावर आहे. या षटकारासह त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील ३०० वा षटकार पूर्ण केला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत २७४ सामन्यांमध्ये ८०३ चौकार मारले आहेत. त्याच्या खालोखाल माजी फलंदाज शिखर धवन आहे, ज्याने २२२ आयपीएल सामन्यांमध्ये ७६८ चौकार मारले आहेत. डेव्हिड वॉर्नर ६६३ चौकारांसह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा देखील या यादीत असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २७६ सामन्यांमध्ये ६५३ चौकार मारले आहेत. २०५ सामन्यांमध्ये ५२२ चौकार मारून अजिंक्य रहाणे या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे फलंदाज

विराट कोहली: ८०३* चौकार
शिखर धवन: ७६८ चौकार
डेव्हिड वॉर्नर: ६६३ चौकार
रोहित शर्मा: ६५३ चौकार
अजिंक्य रहाणे: ५२२ चौकार

गुजरात टायटन्सविरुद्ध एक षटकार लगावत कोहलीने आयपीएलमध्ये ३०० षटकार पूर्ण केले आणि असा पराक्रम करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम माजी क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या नावावर आहे, त्याने १४२ सामन्यांमध्ये ३५७ षटकार मारले आहेत. या यादीत २७६ सामन्यांमध्ये ३१० षटकार मारणारा रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत २७४ सामन्यांमध्ये ३०० षटकार पूर्ण करणारा विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

ख्रिस गेल: ३५७ षटकार
रोहित शर्मा: ३१० षटकार
विराट कोहली: ३०० षटकार
एम.एस. धोनी: २६४ षटकार
ए.बी. डिव्हिलियर्स: २५१ षटकार